साहित्यप्रेमी सेवाभावी फाउंडेशन व वन विभागाच्या ‘साहित्यिक संवादात’ पेपरफुटी, वृक्षतोड आणि ढासळत्या शैक्षणिक दर्जावर मान्यवरांचा जोरदार प्रहार.
। लोकजागर । फलटण । ३० मे २०२६ ।
“साहित्य हे माणसाला खऱ्या अर्थाने जगायला शिकवते. साहित्यामध्ये कोणताही भेदभाव न करता मानवी मूल्ये आणि मानवता जपण्याचे पवित्र काम साहित्यिक संस्थांनी करणे गरजेचे आहे. साहित्यिक संस्था या जुन्या व नवीन कवी, लेखक, नाट्यलेखक आणि कथालेखक यांचा योग्य मेळ घालून नवोदितांना पुढे जाण्याचे बळ देत असतात. सध्याच्या काळात काही साहित्य संस्थांमध्ये राजकारण पराकोटीला गेलेले दिसून येत असून पैशापुढे जग फिके पडत आहे, ही खेदाची बाब आहे. अशा वातावरणात साहित्यिक संस्थांनी राजकारण बाजूला ठेवून सर्वसमावेशकता जोपासावी आणि साहित्यिकांनी कमालीची सजगता बाळगावी,” असे प्रतिपादन प्रसिद्ध प्राचार्य रवींद्र येवले यांनी केले.
साहित्यप्रेमी सेवाभावी फाउंडेशन आणि वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने फलटण येथील नाना-नानी पार्क येथे ३९ व्या ‘साहित्यिक संवाद’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मुख्य वक्ते म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाला संयोजक व माणदेशी साहित्यिक ताराचंद्र आवळे, प्रा. सुधीर इंगळे, वन्यजीव संघटनेचे सचिन जाधव आणि मंगेश कर्वे यांची प्रमुख उपस्थिती होती. या संवादामध्ये सध्याच्या सामाजिक, शैक्षणिक आणि पर्यावरणीय परिस्थितीवर मान्यवरांनी अत्यंत परखड मते मांडली.
लेखणीच्या माध्यमातून विकृत मनोवृत्तीच्या समाजकंटकांना रोखा: ताराचंद्र आवळे संयोजक व माणदेशी साहित्यिक ताराचंद्र आवळे यांनी सध्याच्या ज्वलंत मुद्द्यांवर बोट ठेवले. “सध्याच्या काळात पेपरफुटीचे प्रमाण वाढत चालले असून ही बाब अत्यंत गंभीर आहे. आपल्या लेखणीच्या माध्यमातून सरकारला आणि विकृत मनोवृत्तीच्या समाजकंटकांना वेळीच रोखणे गरजेचे आहे. वृक्षतोड, पेपरफुटी आणि दिवसेंदिवस वाढते तापमान या बाबी मानवी जीवनासाठी फार भयंकर होत चालल्या आहेत. सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी आणि मानवी मूल्ये जपण्यासाठी सर्वांनी सकारात्मक राहून योग्य वेळी योग्य बाबींवर लेखणीच्या माध्यमातून प्रहार केला पाहिजे,” असे आवाहन त्यांनी केले.
शैक्षणिक दर्जा ढासळल्यास देश रसातळाला जाईल: प्रा. सुधीर इंगळे शिक्षण क्षेत्रातील विदारक स्थितीवर बोलताना प्रा. सुधीर इंगळे यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. “ज्या देशाचा शैक्षणिक दर्जा ढासळतो, तो देश लवकरच रसातळाला जातो. देशाचा शिक्षक जर भ्रष्ट झाला, तर तो संपूर्ण देश भ्रष्ट व्हायला वेळ लागत नाही. आज शैक्षणिक क्षेत्राची झालेली वाताहात पाहिली तर त्यावर विश्वासच बसत नाही; दुर्दैवाने या गंभीर विषयावर एकही राजकीय पक्ष बोलताना दिसून येत नाही,” अशी घणाघाती टीका त्यांनी केली. तर, वन्यजीव संघटनेचे सचिन जाधव आणि मंगेश कर्वे यांनी वाढत्या जागतिक तापमानावर व बेकायदेशीर वृक्षतोडीवर जोरदार प्रहार केला. आज सर्वासमक्ष ५०-५० वर्षे जुने वृक्ष राजरोसपणे तोडले जात असताना समाज व प्रशासन गप्प का? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.
या महत्त्वपूर्ण साहित्यिक संवाद कार्यक्रमास सचिन भांडवलकर, गणेश गुळवे, मयूर शेरखाने, विक्रम भांडवलकर, सुरेश आवळे यांच्यासह फलटण शहर व तालुक्यातील अनेक नामांकित साहित्यिक, कवी, साहित्य रसिक आणि निसर्गप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
