नगरसेविका सिद्धाली अनुप शहा यांच्या पुढाकारातून १३ जून रोजी तीर्थयात्रेचा सोहळा; फलटणमधील महिलांना मिळणार दर्शनाची संधी.
। लोकजागर । फलटण । ९ जून २०२६ ।
फलटण शहरातील महिलांना आध्यात्मिक आनंद मिळावा आणि तीर्थक्षेत्रांचे दर्शन सुलभ व्हावे, या उद्देशाने माउली फाउंडेशन, फलटण यांच्या वतीने अधिक मासानिमित विशेष ‘दर्शनयात्रे’चे आयोजन करण्यात आले आहे. फलटण नगर परिषदेच्या नगरसेविका सौ. सिद्धाली अनुप शहा आणि माउली फाउंडेशन यांच्या पुढाकारातून ही यात्रा केवळ महिलांसाठी आयोजित करण्यात आली असून, यामध्ये अक्कलकोट आणि पंढरपूर या दोन प्रमुख तीर्थक्षेत्रांचा समावेश आहे.
ही विशेष दर्शनयात्रा शनिवार, दिनांक १३ जून २०२६ रोजी फलटण येथून मार्गस्थ होणार आहे. या यात्रेमध्ये सहभागी होणाऱ्या महिला भाविकांना अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन आणि पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे.
भक्ती आणि श्रद्धेचा संगम: महिलांना सुरक्षित आणि सुखकर प्रवास मिळावा यासाठी फाउंडेशनच्या वतीने विशेष नियोजन करण्यात आले आहे. महिलांमध्ये भक्तीची ओढ वाढवणे आणि त्यांना दैनंदिन कामातून थोडा विरंगुळा मिळावा, या सामाजिक भावनेतून नगरसेविका सिद्धाली शहा यांनी या उपक्रमाचे आयोजन केले आहे. या यात्रेच्या नियोजनासाठी माउली फाउंडेशनचे कार्यकर्ते परिश्रम घेत असून, फलटणमधील महिला वर्गामध्ये या दर्शनयात्रेबाबत मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
दर्शनयात्रेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या महिलांनी अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी आयोजकांशी संपर्क साधावा, असे आवाहन नगरसेविका सिद्धाली अनुप शहा आणि माउली फाउंडेशन, फलटण यांच्या वतीने करण्यात आले आहे.
