पुण्यात ‘अर्जुनाचा गांडीव शोध’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न
। लोकजागर । फलटण / पुणे । १८ जून २०२६ ।
सावरकर अध्यापन केंद्र, पुणे येथे तरुण लेखक रविराज लिखित ‘अर्जुनाचा गांडीव शोध’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना फलटणचे युवराज श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांनी, “साहित्य, संस्कृती आणि वैचारिक चळवळींना चालना देणारे असे उपक्रम समाजाला योग्य दिशा देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत,” असे प्रतिपादन केले. तसेच फलटणसह विविध ठिकाणी अशा प्रकारची प्रगल्भ साहित्य संमेलने व दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी नाईक निंबाळकर राजघराण्याकडून भविष्यातही सर्वतोपरी सहकार्य राहील, अशी ग्वाही त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात दिली.
या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ अभिनेते व महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष श्री. योगेश सोमण लाभले होते, तर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष श्री. प्रदीप निफाडकर यांची विशेष उपस्थिती होती. याशिवाय प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. प्रसाद जोशी, आध्यात्मिक गुरू प्रमोद पानसे, विद्या वैभव प्रकाशनचे प्रमुख बकुळ पराडकर आणि प्राचार्य रवींद्र येवले आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. विशेष म्हणजे, या पुस्तकाचे लेखक रविराज हे ‘आयटी’ (IT) क्षेत्रातील उच्चशिक्षित तरुण असून, त्यांनी आपली नोकरी सोडून पूर्णवेळ पुस्तक लेखनाचा मार्ग स्वीकारला आहे. विशेष कौतुकाची बाब म्हणजे ‘अर्जुनाचा गांडीव शोध’ हे त्यांचे चौथे यशस्वी पुस्तक आहे.
या कार्यक्रमात बोलताना प्राचार्य रवींद्र येवले यांनी आपल्या ओघवत्या आणि अभ्यासपूर्ण शैलीत उत्कृष्ट भाषण करून उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या या भाषणाची दखल घेत ज्येष्ठ अभिनेते योगेश सोमण यांनी अत्यंत गौरवपूर्ण उद्गार काढले आणि सध्याच्या शिक्षण क्षेत्रात व समाजात अशा मार्गदर्शक शिक्षकांची नितांत गरज असल्याचे सांगितले. या संपूर्ण सोहळ्याचे नियोजन अनुबंध कला मंडळाचे अध्यक्ष बकुळ पराडकर यांनी केले होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व मान्यवरांना फलटणचे राजे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या वैभवशाली कारकिर्दीवर आणि लोकहितैषी कार्यावर आधारित ‘अजिंक्य राजा’ हे पुस्तक भेट म्हणून देण्यात आले. या सोहळ्यासाठी फलटण येथून प्रामुख्याने ॲड. विजय नेवसे, विजय जाधव, विष्णुपंत शिंदे आणि अरुण भोईटे उपस्थित होते.
