कृषि विभागाच्या वतीने सासकल येथे ‘शेतकरी रमले नैसर्गिक शेतीशाळेत’

एल निनोच्या पार्श्वभूमीवर कमी पाण्यातील पिके व पाणी व्यवस्थापनाबाबत पाडेगावच्या तज्ज्ञांकडून सखोल मार्गदर्शन.

। लोकजागर वृत्त । फलटण । २३ जून २०२६ ।

महाराष्ट्र नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत कृषि विभागामार्फत फलटण तालुक्यातील सासकल येथे मका पीक शेतीशाळेचे अत्यंत नेटके आयोजन करण्यात आले होते. या शेतीशाळेची सुरुवात सर्व उपस्थित शेतकऱ्यांनी घेतलेल्या प्रतिज्ञेने करण्यात आली. कृषि विभागाचे मा. प्रधान सचिव परिमल सिंह तसेच महाराष्ट्र राज्याचे कृषि आयुक्त सूरज मांढरे यांच्या विशेष सूचनेनुसार या शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. एल निनोच्या पार्श्वभूमीवर कमी पाण्यावर येणाऱ्या व दुष्काळ सहन करणाऱ्या पिकांची निवड कशी करावी, पेरणीपूर्वीचे अचूक नियोजन, हवामान आधारित कृषि सल्ल्याचा अवलंब, पावसाच्या पाण्याचे संधारण, शेततळे व जलसंधारण, ठिबक सिंचन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, आंतरपीक, मिश्र पीक व बहुपीक पद्धतीचा अवलंब, मृदा आरोग्य पत्रिका व्यवस्थापन, सेंद्रिय कर्बवाढीसाठीच्या विविध उपाययोजना, पीक विमा योजना, हवामान आधारित सल्ला सेवा, जोखीम व्यवस्थापनाची माहिती, चारा व्यवस्थापन व पशुधन संरक्षण उपाय आणि हवामान बदलाशी जुळवून घेणाऱ्या कृषि तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिके या शेतीशाळेच्या माध्यमातून आगामी काळात राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

सातारा जिल्ह्याच्या जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री फरांदे, फलटणचे उपविभागीय कृषि अधिकारी खलिद मोमीन, तालुका कृषि अधिकारी दत्तात्रय गायकवाड आणि विडणीचे मंडळ कृषि अधिकारी अशोक जगदाळे यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली सासकल येथे या शेतीशाळेचे यशस्वी नियोजन करण्यात आले. याप्रसंगी मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगावचे ऊस विशेषज्ञ डॉ. राजेंद्र भिलारे यांनी नैसर्गिक शेती शाळा मिशन व संतुलित खताचा वापर जागृती अभियानांतर्गत ‘सुपीक माती, अधिक उत्पादन आणि समृद्ध शेतकरी’ या विषयावर शेतकऱ्यांना संबोधित केले. त्यांनी सुपीक मातीचे महत्त्व, गांडूळ खत, जैविक खत, कंपोस्ट खत आणि हिरवळीच्या खतांचा शेतीत कसा वापर करावा, याबद्दल अत्यंत सखोल व तांत्रिक मार्गदर्शन केले.

पाडेगावचे ऊस रोगशास्त्रज्ञ डॉ. सूरज नलवडे यांनी एल निनोच्या गंभीर पार्श्वभूमीवर फळपिके व इतर पिकांना आच्छादन (मल्चिंग) करणे, पाणी व्यवस्थापनामध्ये ठिबक सिंचनाचा शंभर टक्के अवलंब करणे आणि कमी कालावधीतील पिकांचे योग्य नियोजन कसे करावे, याबद्दल शेतकऱ्यांना बहुमोल सल्ला दिला. पाडेगावचेच कनिष्ठ संशोधन सहाय्यक संतोष शिंदे यांनी सेंद्रिय निविष्ठा घरच्या घरी कशा तयार कराव्यात याबद्दल सविस्तर माहिती दिली. या महत्त्वपूर्ण शेतीशाळेसाठी विडणीचे उप कृषि अधिकारी अजित सोनवलकर, कृषि सेवारत्न तथा सहाय्यक कृषि अधिकारी सचिन जाधव, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) चे बीटीएम सचिन आवारे, कृषि सहायक नवनाथ रसाळ यांच्यासह कृषि महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी आणि सासकल परिसरातील शेतीशाळेत सहभागी झालेले शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि उपस्थितांचे आभार कृषि सेवारत्न सचिन जाधव यांनी मानले.

Spread the love