१ ऑगस्टला शहरातून निघणार भव्य मिरवणूक; जयंती उत्सव समितीचे सर्व समाजबांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन
। लोकजागर वृत्त । फलटण । ३० जुलै २०२६ ।
अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्रातील प्रभावशाली समाजसुधारक, लोककवी आणि थोर साहित्यिक होते. आपल्या धारदार लेखणीतून आणि शाहिरीतून त्यांनी उपेक्षित, शोषित, कामगार आणि दलित समाजाच्या वेदना मांडत सामाजिक परिवर्तनाचा संदेश दिला. यंदा त्यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त फलटण शहर व तालुका जयंती उत्सव समितीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांसह भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती समितीच्या वतीने देण्यात आली. १ ऑगस्ट २०२६ रोजी फलटण शहरात विविध सामाजिक संघटना व सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने मोठ्या उत्साहात जयंती साजरी केली जाणार आहे.
या निमित्ताने ३१ जुलै २०२६ रोजी अण्णाभाऊ साठे समाज मंदिर, मंगळवार पेठ, फलटण येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मोफत आरोग्य तपासणी शिबिर व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. त्याच दिवशी मध्यरात्री १२ वाजता पाचबत्ती चौकात अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात येणार आहे. त्यानंतर १ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता भव्य मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. ही मिरवणूक मंगळवार पेठ येथून सुरू होऊन पाचबत्ती चौक, बारामती चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, भीमराव आंबेडकर चौक, महावीर स्तंभ, उमाजी नाईक चौक, गजानन चौक, मनमोहन राजवाडा मार्गे पुन्हा पाचबत्ती चौकात येऊन समाप्त होईल.
या मिरवणुकीमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिकृतीसह विविध महापुरुषांचे देखावे, पारंपरिक वाद्यपथके, आधुनिक ध्वनिव्यवस्था आणि आकर्षक रोषणाई हे प्रमुख आकर्षण असणार आहे. या सर्व कार्यक्रमांमध्ये सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन जयंती उत्सव यशस्वी करावा, असे आवाहन फलटण शहर व तालुका जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
