अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेतर्फे विद्यार्थी गुणगौरव व शिष्यवृत्ती वाटप सोहळा उत्साहात

दत्तक विद्यार्थी योजनेत ५ टक्के लाभार्थी समाजासाठी राखीव; उपनगराध्यक्ष प्रियदर्शनी भोसले यांची घोषणा.

। लोकजागर वृत्त । फलटण । ५ ऑगस्ट २०२६ ।

अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था नाशिक केंद्र फलटण यांच्या वतीने नवलबाई मंगल कार्यालय फलटण येथे विद्यार्थी गुणगौरव आणि शिष्यवृत्ती वाटप समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त प्राध्यापक मुधोजी महाविद्यालय फलटण ओ जी कुलकर्णी, तर प्रमुख अतिथी म्हणून उपनगराध्यक्ष आणि संचालिका, ब्रिलियंट अकॅडमी, फलटण प्रियदर्शनी रणजीत सिंह भोसले उपस्थित होत्या. संस्थेकडे समाजातील दानशूर व्यक्तींनी ठेवलेल्या ठेवीतून तसेच दिलेल्या देणगीमधून तयार झालेल्या निधीचे होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती म्हणून वाटप करण्यात येते, तसेच दहावी आणि बारावीमधून उत्तीर्ण विद्यार्थी आणि विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव या वेळी करण्यात आला.

कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करताना उपनगराध्यक्ष प्रियदर्शनी भोसले यांनी शालेय जीवनात झालेल्या जडणघडणीचा पुढील जीवनावर झालेला योग्य परिणाम विद्यार्थ्यांसमोर उद्धृत केला. तसेच आपल्या शैक्षणिक संस्थेमध्ये सुरू असलेल्या दत्तक विद्यार्थी योजनेमध्ये ५ टक्के लाभार्थी समाजासाठी राखीव ठेवल्याचे त्यांनी या निमित्ताने जाहीर केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष ओ जी कुलकर्णी यांनी विद्यार्थी म्हणून आपली कारकीर्द सांगताना आताच्या विद्यार्थ्यांना आदर्श अशी अपेक्षित जीवनशैली विद्यार्थ्यांसमोर मांडली.

केंद्रप्रमुख चंद्रशेखर दाणी यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये एकूणच संस्थेच्या पुढील धोरणाचा आढावा घेतला, तसेच नूतन कार्यकारिणीची उपस्थितांना ओळख करून दिली. कार्यकारिणी सदस्य प्रमोद शास्त्री यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल तगारे आणि श्रुती इनामदार यांनी केले. या कार्यक्रमासाठी देणगीदार, हितचिंतक, विद्यार्थी, पालक, नागरिक तसेच संस्था सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व कार्यकारिणी सदस्यांनी परिश्रम घेतले.

Spread the love