फलटण तालुक्याच्या हरितक्रांतीसाठी ‘अटल आनंद घन वन प्रकल्प’ पहिले पाऊल : रवींद्र बेडकीहाळ

वन विभागा कार्यालयाशेजारी १.५० हेक्टर क्षेत्रात मियावाकी पद्धतीने ४५ हजार वृक्षांची लागवड.

। लोकजागर वृत्त । फलटण । ७ ऑगस्ट २०२६ ।

पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण आणि भावी पिढ्यांसाठी हरित वारसा निर्माण करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या वन विभागातर्फे फलटण येथे ‘अटल आनंद घन वन प्रकल्पाचा’ शुभारंभ उत्साहात झाला. या प्रकल्पाचा शुभारंभ महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रवींद्र बेडकीहाळ यांच्या हस्ते वडाचे रोप लावून झाला. वन विभागाच्या कार्यालयाशेजारील सुमारे १.५० हेक्टर क्षेत्रात मियावाकी पद्धतीने तब्बल ४५ हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार असून, या माध्यमातून दाट घनवन विकसित केले जाणार आहे.

या वेळी बोलताना रवींद्र बेडकीहाळ यांनी ‘अटल आनंद घन वन प्रकल्प’ हे फलटण तालुक्याच्या हरितक्रांतीच्या दिशेने वन विभागाने उचललेले महत्त्वाचे पहिले पाऊल असल्याचे सांगितले. वनक्षेत्रपाल निकिता बोटकर व त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक करत हा उपक्रम केवळ शहरापुरता मर्यादित न ठेवता तालुक्यातील टेकड्या, किल्ले व मोकळ्या जागांवरही राबवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसे झाल्यास संपूर्ण फलटण तालुका हिरवागार होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

वनक्षेत्रपाल निकिता बोटकर यांनी प्रकल्पाची माहिती देताना सांगितले की, स्थानिक हवामानास पोषक विविध प्रजातींची लागवड करण्यात येणार असून, त्यामुळे हरितक्षेत्र वाढ, भूजल पातळी सुधारणा, तापमान नियंत्रण आणि जैवविविधतेचे संवर्धन होण्यास मोठी मदत होईल. या वेळी वनपाल नितीन जगदाळे, वनरक्षक आश्विनी लोखंडे, देवकी तहसीलदार, प्रियंका पालवे, सुधीर इंगळे, कांचन खरात, बापू बर्गे, सचिन जाधव, मंगेश कर्वे तसेच विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, पर्यावरणप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी वृक्षसंवर्धनाची शपथ घेत पर्यावरण रक्षणाचा निर्धार व्यक्त केला.

Spread the love