काटकसर आणि पारदर्शक कारभारामुळे संस्था प्रगतीपथावर; ३८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ८० कोटींच्या ठेवींचा आढावा सादर.
। लोकजागर वृत्त । फलटण । १६ सप्टेंबर २०२६ ।
श्री सद्गुरू पतसंस्थेने पारदर्शी व काटकसरीने काम करीत उद्दिष्ट पूर्ततेसाठी प्रयत्न करून सभासदांना १० टक्के लाभांश देत आहे, ही खरोखरच कौतुकाची बाब आहे असे प्रतिपादन सद्गुरु व महाराजा उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांनी केले. श्री सद्गुरु हरिबुवा महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित फलटण या संस्थेच्या ३८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. याप्रसंगी चेअरमन तेजसिंह भोसले, व्हाईस चेअरमन राजाराम फणसे, महाराजा मल्टीस्टेटचे व्हाईस चेअरमन रणजितसिंह भोसले, सद्गुरु पतसंस्थेचे संचालक तुषार गांधी, मधुबाला भोसले, चंद्रकांत बर्गे, सुभाष नरळे, प्रभाकर भोसले, धर्माजी भोसले, स्वाती फुले व इतर संचालक उपस्थित होते.
भोसले पुढे म्हणाले की, काटकसर व प्रामाणिकपणा जपत संस्थेच्या वाढीसाठी प्रयत्नशील आहोत. संस्थेच्या ८ शाखा असून गुंतवणूक ३६ कोटी १९ लाख आहे, ही अभिमानास्पद बाब आहे. गेल्या ३९ वर्षात कधीही ठेवपंधरवडा केला नाही. सहकारात सध्या उत्साह दिसत नसून चुकीच्या पद्धतीने एखाद्या संस्थेने काम केल्यास त्याचा परिणाम इतर संस्थांवर होत असतो, मात्र सभासद व ठेवीदार यांचे हित लक्षात घेऊन कारभार केल्याने संस्था आजही प्रगतीपथावर आहे असे त्यांनी नमूद केले.
प्रास्ताविक व स्वागतामध्ये चेअरमन तेजसिंह भोसले यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा सादर केला. संस्थेने आपला नावलौकिक कायम ठेवला असून संस्थेकडे ८० कोटी २८ लाख रुपये ठेव आहे, तर ५७ कोटी १२ लाख रुपयांचे कर्जवाटप झालेले आहे. संस्थेस आर्थिक वर्षात ६२ लाख ३० हजार रुपये नफा झाला असून सभासदांना १० टक्के लाभांश दिला जाणार आहे. कर्जदार चांगला असेल तरच ठेवीदार सुरक्षित राहतात, म्हणून कर्जदार व त्याची कागदपत्रे तपासूनच कर्ज दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. प्रारंभी प्रतिमा पूजन आणि श्रद्धांजली अर्पण केल्यावर सभेच्या मुख्य कार्यक्रमास सुरवात झाली. संस्थेचे सरव्यवस्थापक संदीप जगताप यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले व सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. महाराजा मल्टीस्टेटचे व्हाईस चेअरमन रणजितसिंह भोसले यांनी आभार मानले असून ही सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.
