गौरी-गणपती सजावटीतून बळीराजाला अनोखी मानवंदना; गिरवीतील भक्ती जाधवच्या कल्पक देखाव्याचे सर्वत्र कौतुक!

इयत्ता सातवीतील विद्यार्थिनीने साकारला शेतीचा हुबेहूब देखावा; पारंपरिक संस्कृती जपल्याबद्दल पंचक्रोशीतून नागरिकांची मोठी गर्दी.

। लोकजागर वृत्त । गिरवी । २० सप्टेंबर २०२६ ।

गौरी-गणपती उत्सवाचे औचित्य साधून गिरवी येथे इयत्ता सातवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीने साकारलेल्या शेतीच्या हुबेहूब देखाव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. शेतात राबणारे शेतकरी, झोपडी, विहीर आणि शेतीच्या विविध अवजारांचा समावेश असलेले आकर्षक फार्म मॉडेल तयार करून तिने बळीराजाला अनोखी मानवंदना दिली आहे. गिरवी गावची रहिवासी भक्ती महेंद्र जाधव हिने ही कल्पक सजावट केली असून तिला तिचे वडील महेंद्र जाधव यांची मोलाची मदत लाभली आहे, तर आशिष जाधव यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

या देखाव्यात शेतात काम करणारे शेतकरी, बैलजोडीच्या सहाय्याने नांगरणी, धान्य कापणी करणाऱ्या महिला, गवत आणि मातीची सुंदर झोपडी, दगडांनी बांधलेली विहीर व रहाट, तसेच नांगर, विळा, कोयता, खुरपे व टोपली यासारखी शेतकऱ्यांची पारंपरिक अवजारे अत्यंत बारकाईने मांडण्यात आली आहेत. हिरवीगार शेती, शेतातील पीक आणि मातीचा सुगंध यामुळे हा देखावा अगदी जिवंत वाटत आहे.

यावेळी बोलताना भक्ती जाधव हिने सांगितले की, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे आणि त्याचे कष्ट तसेच त्याचे जीवन सर्वांपर्यंत पोहोचावे या उद्देशाने हा शेतीचा देखावा तयार केला आहे, यासाठी वडिलांचे मोठे सहकार्य लाभले आहे. आधुनिक व डीजे सजावटीच्या काळात भक्तीने जपलेली शेती संस्कृती आणि तिची कल्पकता विशेष कौतुकास्पद ठरत आहे. तिचा हा उत्कृष्ट देखावा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिक, महिला व विद्यार्थी मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत.

Spread the love