। लोकजागर वृत्त । सांगली । १२ ऑगस्ट २०२६ ।
दुबई, थायलंड पाठोपाठ आता रविवारी विश्वजीत मराठी सेलिब्रिटी क्रिकेट लिगचा सामना रंगणार आहे. यामध्ये प्रवीण तरडे, संजय जाधव, सिद्धार्थ जाधव, हार्दिक जोशी, अक्षया देवधर, गौतमी पाटील, राधा पाटील आदींसह सुमारे ६० हून अधिक कलाकारांच्या रूपाने मराठी चित्रपटसृष्टीच मैदानात अवतरणार आहे. आमदार विश्वजीत कदम यांच्या अध्यक्षतेखाली अभिजित कदम मेमोरियल फौंडेशनच्या वतीने भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानावर होणाऱ्या या स्पर्धेच्या निमित्ताने सांगलीकरांसाठी मोठी दुहेरी पर्वणीच ठरणार आहे.
विद्युत प्रकाशझोतात सायंकाळी ४ ते रात्री ११ या वेळेत होणाऱ्या स्पर्धेत अभिनेते सौरभ गोखले, शशांक केतकर, नितीश चव्हाण, प्रथमेश परब (दगडू), अभिनय बेर्डे, महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेते पृथ्वीक प्रताप, अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर, शिवाली परब, वनिता खरात, प्रख्यात नृत्यांगना गौतमी पाटील, राधा पाटील आदींसह ६० हून अधिक अभिनेते, अभिनेत्री मैदानात उतरून फटकेबाजी व गोलंदाजीसह क्षेत्ररक्षण करणार आहेत. यासोबतच बिगबॉस फेम रिलस्टार धनंजय पोवार यांच्यासह सुमारे १५० हून अधिक महाराष्ट्रातील प्रसिद्ध रिलस्टार्स, इन्फ्लुएन्झर्सचे संघही स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या स्पर्धेची भारती विद्यापीठाच्या मैदानावर तयारी पूर्ण झाली आहे. नाट्यपंढरी व क्रीडापंढरी म्हणून सांगलीचा नावलौकिक आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या तीन वर्षांपासून प्रीमियर लिगच्या धर्तीवर मराठी सेलिब्रिटी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. त्यातून दुबई, थायलंड अशा ठिकाणी मराठी सेलिब्रिटींच्या प्रीमियर लिग पार पडल्या. यात अनेक ज्येष्ठ चित्रपट अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शकांसह मान्यवरांनी सहभाग घेतला होता.
विकासासाठी आणि विशेषतः शिक्षण, समाजकारण, क्रीडासह सर्वच क्षेत्राला पाठबळ देण्याचा पायंडा रचलेले लोकनेते पतंगराव कदम यांचा समर्थ वारसा चालवणारे त्यांचे सुपुत्र भारती विद्यापीठाचे कार्यवाह आमदार विश्वजीत कदम यांनी या स्पर्धेला पाठबळ देत पालकत्व स्वीकारले आहे. सांगली जिल्ह्यासाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचे सांगत विश्वजीत कदम यांनी स्पर्धेच्या आयोजनासाठी सर्वतोपरी सहकार्याची जबाबदारी स्वीकारली आहे. तर भारती विद्यापीठाच्या वतीने संपूर्ण यंत्रणेने युद्धपातळीवर स्पर्धेची तयारी सुरू केली आहे.
या स्पर्धा मराठी सेलिब्रिटींसोबतच सांगली जिल्ह्यातील खेळाडूंच्या माध्यमातून आठ संघांमध्ये रंगणार आहेत. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी १५ ऑगस्ट रोजी सांगली जिल्ह्यातील सर्व दैनिकांचे संपादक व जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील सर्व विभागातील प्रशासकीय अधिकारी यांच्यात प्रथम प्रदर्शनीय सामना रंगणार आहे. दुसऱ्या दिवशी स्पर्धेतील सर्व कप्तान व सांगली जिल्ह्याचे खासदार, आमदारांसह जिल्ह्यातील अनेक दिग्गज लोकप्रिय लोकप्रतिनिधी यांच्यात बहारदार सामना होणार आहे. या स्पर्धेच्या नियोजनाची सांगलीत जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. दोन दिवस या निमित्ताने संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार सांगलीत क्रिकेटचा आनंद लुटत सांगलीकरांचा पाहुणचार घेणार आहेत.
या स्पर्धेचे उद्घाटन पालकमंत्री व उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार असून भारती विद्यापीठाचे कार्यवाह आमदार विश्वजीत कदम अध्यक्षस्थानी आहेत. खासदार, आमदारांसह मान्यवरांच्या उपस्थितीत या स्पर्धेच्या उद्घाटनाचा शानदार सोहळा स्वातंत्र्यदिनी शनिवारी, दिनांक १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे.
आमदार विश्वजीत कदम यांनी न भूतो न भविष्यती अशा पद्धतीने या स्पर्धा पार पडतील असा विश्वास पुणे येथे मोठ्या दिमाखात पार पडलेल्या ट्रॉफी व जर्सी अनावरण सोहळ्यात व्यक्त केला होता. त्यानुसार त्यांनी भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानावर आच्छादित मंडपात आणि नव्याने टर्फची उभारणी करून स्पर्धा पार पाडण्यासाठी युद्धपातळीवर तयारीचे आदेश यंत्रणेला दिले आहेत. त्यातून भव्य मंडप, मैदान उभारणीची रात्र आणि दिवस तयारी सुरू झाली. चित्रपट कलाकारांना सुरक्षित खेळता यावे यासाठी सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे, तसेच सांगलीकरांना कलाकारांच्या खेळाचा आस्वाद घेता यावा यासाठी सुसज्ज बैठक व्यवस्थाही त्यासोबत करण्यात आली आहे. व्हीव्हीआयपी, व्हीआयपी बैठक व्यवस्थेसह सामान्य सांगलीकर यांना दोन दिवस सामने पाहता यावेत यासाठी स्वतंत्र स्क्रीनचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
या स्पर्धेत अभिनेते प्रवीण तरडे, स्नेहल तरडे, संजय जाधव, सिद्धार्थ जाधव, मंगेश देसाई, हार्दिक जोशी, अक्षया देवधर, सौरभ गोखले, शशांक केतकर, अभिनेत्री क्षितिजा घोसाळकर, पार्थ भालेराव, अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, संस्कृती बालुगडे, अभिनेत्री नृत्यांगना गौतमी पाटील, राधा पाटील, महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेते गौरव मोरे, पृथ्वीक प्रताप, अभिनेत्री रसिका वेंगुर्लीकर, शिवाली परब, वनिता खरात, निखिल बने, मंदार मांडवकर, अभिनेते महेश लिमये, अमोल नाईक, प्रख्यात अभिनेत्री राधा सागर, सोनाली पाटील, हिंदवी पाटील, मोनालिसा बागल, प्राजक्ता जाधव, विशाल निकम, ऋतुराज फडके, अशोक फलदेसाई, हर्षद अटकरी, प्रसाद सुर्वे, धनंजय पोवार, अक्षय वाघमारे, सँडी जुवाडकर, मंगेश बोरगावकर, नितीश चव्हाण, विशाल देवरुखकर, अक्षय तनसाडे, रमेश परदेशी, प्रसाद सुर्वे, ऋतुराज गायकवाड, अभिनेत्री आर्या परदेशी, प्रतीक्षा नलावडे, धनश्री काडगावकर, शैलजा कुलकर्णी, प्रतीक्षा जाधव, अभिनेते अमोल नाईक, शैलेश देशमुख, गौरव रोकडे, शंतनू भोसले, अजिंक्य जाधव मैदानात उतरणार आहेत.
