रणजितदादांच्या पुढाकारातून फलटणच्या प्रलंबित प्रश्नांवर महत्त्वपूर्ण निर्णय

मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न

। लोकजागर वृत्त । फलटण । १२ ऑगस्ट २०२६ ।

राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्राची दखल घेत ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीचा सविस्तर अहवाल थेट मुख्यमंत्री सचिवालयाला पाठवण्यात येणार असल्याने, फलटण शहर आणि तालुक्यातील अनेक प्रलंबित प्रश्नांवर अधिकाऱ्यांनी तातडीने निर्णय घेतले आहेत.

या महत्त्वपूर्ण बैठकीला माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, जिल्हा पोलीस प्रमुख निखिल पिंगळे, प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर, तहसीलदार अभिजित जाधव, सातारा जिल्हा बँकेचे संचालक शिवरूपराजे खर्डेकर, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजीत नाईक निंबाळकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत महावितरणच्या कारभारावर सविस्तर चर्चा झाली. शहरात आणि पालखी मार्गावरील रस्त्यालगत असणारे धोकादायक पोल व डीपी हलवण्याची मागणी करण्यात आली. आमदार सचिन पाटील यांनी दिलेल्या आदेशानुसार सध्या शहर व तालुक्यात ११ केव्हीचे डीपी बसवण्याचे काम सुरू असून यामुळे डीपी चोरीला आळा बसेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. फलटण शहरासाठी मंजूर असलेले सब-स्टेशन तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना आमदारांनी दिल्या. ग्रामीण भागात शेती फिडरवर संध्याकाळी ६ ते १० वीज नसते, यावर त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच जॅक्सन कंपनीचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याने त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी ३ नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्याचे काम सुरू असल्याची माहिती या वेळी देण्यात आली. डीपी बदलण्यासाठी डीपीडीसी मधून निधी देण्याची मागणी माजी खासदार रणजितसिंह यांनी केली.

नाईकबोमवाडी येथे नवीन एमआयडीसी मंजूर झाली असून येत्या काही महिन्यांत तिथे नवीन कंपन्या येणार आहेत. त्यामुळे तेथे तातडीने नवीन सब-स्टेशन उभारण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच, फलटण रेल्वे स्टेशनकडे जाणारे सर्व रस्ते तातडीने करण्यासाठी हे रस्ते डिसेंबर महिन्याच्या बजेटमध्ये घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या वेळी माजी खासदारांनी फलटण शहर पोलीस स्टेशनची वसाहत ६ महिने तयार असूनही प्रलंबित असल्याचा मुद्दा उपस्थित केला.

ऐतिहासिक वारसा असलेल्या बाणगंगा नदीचा समावेश ‘अमृत २’ योजनेत करण्यात आला आहे. यासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्यावर एकमत झाले. मुधोजी महाविद्यालयाच्या पाठीमागील बाजूपासून ते सस्तेवाडीपर्यंत संपूर्ण नदीचे काँक्रिटीकरण करून सुशोभीकरण केले जाणार आहे. याशिवाय, फलटण तालुक्यासाठी नवीन न्यायालय इमारतीचा प्रस्ताव शासनाकडे दाखल असून, स्थळ पाहणी करून आणि जिल्हा न्यायालयाला विश्वासात घेऊन पुढील अंमलबजावणी करण्याचे ठरले.

फलटणमध्ये सुसज्ज अशा शासकीय रुग्णालयाची गरज लक्षात घेता, झिरपवाडी येथील जुनी इमारत पाडून तिथे नव्याने सुसज्ज असे उपजिल्हा रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव आरोग्य विभागाकडे तातडीने पाठवण्याचे आदेश देण्यात आले. तसेच, फलटण शहराची हद्दवाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत चर्चेला आला. शहराच्या आसपास असलेल्या १४ गावांचा हद्दवाढीचा प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. जे भाग नगरपालिका किंवा ग्रामपंचायत या दोन्हीच्या हद्दीत येत नाहीत, अशा ‘त्रिशंकू’ भागातील नागरिकांना तातडीने मूलभूत सुविधा पुरवण्याबाबतही प्रशासनाला कडक निर्देश देण्यात आले आहेत. या सर्व विषयांवर स्वतः मुख्यमंत्र्यांचे लक्ष असून, या बैठकीतील निर्णयांचा प्रगती अहवाल थेट मुख्यमंत्री सचिवालयाला सादर केला जाणार आहे. त्यामुळे फलटणकरांच्या अनेक वर्षांच्या प्रलंबित मागण्या लवकरच पूर्णत्वास जातील, अशी आशा निर्माण झाली आहे.

Spread the love