माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आमदारांचा पुढाकार; शासकीय अधिकारी राहणार उपस्थित
। लोकजागर वृत्त । फलटण । १४ ऑगस्ट २०२६ ।
फलटण तालुक्यातील नागरिकांचे शासकीय विभागांशी संबंधित वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले प्रश्न आणि तक्रारी जागेवरच निकाली काढण्यासाठी एक मोठा प्रशासकीय उपक्रम हाती घेण्यात आला आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार सचिन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आगामी सोमवार, दिनांक ७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५:३० या वेळेत ‘महाराजा मंगल कार्यालय, फलटण’ येथे भव्य ‘जनता दरबार’ चे आयोजन करण्यात आले आहे.
या जनता दरबारात महसूल, पोलीस, महावितरण, पंचायत समिती, आरोग्य यांसह शासनाच्या विविध प्रमुख विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी प्रत्यक्ष उपस्थित राहून नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करणार आहेत.
नागरिकांना आपल्या समस्यांचे वेळेत आणि सुटसुटीत निवारण करून घेता यावे, यासाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया आजपासूनच सुरू करण्यात आली आहे. तालुक्यातील सर्व नागरिकांनी आपल्या प्रलंबित समस्या आणि तक्रारींचे अर्ज आवश्यक कागदपत्रांसह मंगळवार, दिनांक २५ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत जमा करावेत, असे आवाहन आमदार सचिन पाटील यांनी केले आहे. २५ ऑगस्टनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांवर विचार केला जाणार नसल्याने नागरिकांनी वेळेत अर्ज सादर करून या जनता दरबाराचा पुरेपूर लाभ घ्यावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
📌 तक्रार अर्ज जमा करण्याचे ठिकाण व वेळ:
- ठिकाण: आमदार सचिन पाटील जनसंपर्क कार्यालय (महाराजा मंगल कार्यालयाजवळ, फलटण).
- अंतिम मुदत: २५ ऑगस्ट २०२६ (सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत).
- जनता दरबार तारीख: ७ सप्टेंबर २०२६ (सकाळी ११ ते सायंकाळी ५:३०).
