महाराष्ट्र शासनाच्या उच्चस्तरीय टास्क फोर्सचा उपक्रम; सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पार पडणार संवाद कार्यक्रम.
। लोकजागर वृत्त । फलटण । १२ सप्टेंबर २०२६ ।
राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत केला आहे. या समितीच्या माध्यमातून भरती परीक्षा पद्धतीचा सर्वंकष अभ्यास करण्यात येत असून, पुणे विभागातील विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार, शैक्षणिक संस्था, परीक्षा यंत्रणा आणि विषयतज्ज्ञांशी थेट संवाद साधण्यासाठी शनिवार, १२ सप्टेंबर रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील जिओलॉजी सभागृह, पहिला मजला येथे सल्लामसलत आयोजित करण्यात आली आहे.
पुणे हे राज्यातील स्पर्धा परीक्षा तयारीचे महत्त्वाचे केंद्र असल्याने, भरती परीक्षा पद्धतीतील सुधारणा सुचविण्यासाठी पुणे जिल्ह्यातील उमेदवारांचा प्रत्यक्ष सहभाग या सल्लामसलतीत महत्त्वाचा ठरणार आहे. हा संवाद कार्यक्रम सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होणार असून, पुणे जिल्ह्यासह पुणे महसूल विभागातील संबंधित घटकांना या प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.
या सल्लामसलत कार्यक्रमात भरती परीक्षा प्रक्रियेतील विविध टप्प्यांबाबत पुणे जिल्ह्यातील विद्यार्थी व उमेदवारांचे अनुभव, अडचणी, अपेक्षा आणि सुधारणा सूचना समिती जाणून घेणार आहे. प्रश्नपत्रिका व परीक्षा केंद्र व्यवस्थापन, परीक्षेची सुरक्षितता व विश्वासार्हता, तंत्रज्ञानाचा वापर, उमेदवारांशी संवाद, तक्रार निवारण आणि परीक्षा अनुभव यांसह भरती परीक्षा पद्धतीशी संबंधित विविध विषयांवर सूचना मांडता येणार आहेत, असे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.
