जिल्ह्यातील हॉटेल व धाब्यांची होणार तपासणी

अस्वच्छता व निकृष्ट अन्नाबाबत अपर जिल्हाधिकारी विठ्ठल इनामदार यांचे कडक निर्देश

। लोकजागर वृत्त । सातारा । १४ ऑगस्ट २०२६ ।

ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सातारा जिल्ह्यातील सर्व हॉटेल व धाब्यांची अन्न व औषध प्रशासनामार्फत तसेच संबंधित यंत्रणांकडून तातडीने तपासणी करण्यात यावी, असे कडक निर्देश अपर जिल्हाधिकारी विठ्ठल इनामदार यांनी दिले आहेत. जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची महत्त्वपूर्ण बैठक अपर जिल्हाधिकारी विठ्ठल इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांच्यासह परिषदेचे अशासकीय सदस्य उपस्थित होते.

हॉटेल आणि धाब्यांवर मिळणाऱ्या अन्नपदार्थांचा दर्जा व तेथील स्वच्छतेबाबत कोणतीही हलगर्जीपणा किंवा तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा या वेळी देण्यात आला. तसेच, प्रवाशांची होणारी फसवणूक आणि लूट रोखण्यासाठी रिक्षा संघटना व ग्राहक संघटनांची प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठक घेण्याचे आदेश विठ्ठल इनामदार यांनी दिले. मीटरप्रमाणे भाडे न आकारणाऱ्या आणि मीटर नसलेल्या रिक्षांवर मोहिमेद्वारे थेट कठोर कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.

मनमानी भाडे वसूल करणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात ग्राहकांना तातडीने तक्रार नोंदवता यावी यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत एक विशेष ‘तक्रार निवारण क्रमांक’ जाहीर केला जाणार आहे. याशिवाय, महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेशी जोडलेल्या खासगी रुग्णालयांनी तसे स्पष्ट फलक लावणे आणि रुग्णालयांची यादी सार्वजनिक करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ग्राहकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी तालुका स्तरावरही नियमितपणे ग्राहक परिषदेच्या बैठका घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Spread the love