पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत उपक्रम
। लोकजागर वृत्त । फलटण । १८ ऑगस्ट २०२६ ।
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत देण्यात येणारे मोफत बस पास फलटण आगाराच्या वतीने मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील इयत्ता ५ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना शाळेतच वेळेत व शिस्तबद्ध पद्धतीने वितरित करण्यात आले. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थिनींच्या शिक्षणाचा प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि आर्थिकदृष्ट्या दिलासादायक झाला आहे.
या योजनेमुळे विद्यार्थिनींना शाळा व महाविद्यालयात ये-जा करण्यासाठी होणारा प्रवास खर्च मोठ्या प्रमाणात कमी झाला असून, ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना उच्च शिक्षण घेण्यासाठीही या योजनेचा मोठा फायदा होत आहे. मोफत बस पास वेळेत उपलब्ध झाल्याने विद्यार्थिनींची आर्थिक बचत होण्याबरोबरच वेळही वाचत आहे. तसेच नियमित बससेवेचा लाभ मिळाल्यामुळे विद्यार्थिनींचा प्रवास अधिक सुरक्षित व सुखकर झाला आहे.
मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनींना मोफत पास शाळेच्या ठिकाणीच उपलब्ध करून देण्यासाठी फलटण आगारातील वाहतूक नियंत्रक गोपी जाधव व प्रवीण अहिवळे यांचे विशेष सहकार्य लाभले. विद्यार्थिनींच्या सोयीचा विचार करून पास वितरणाची प्रक्रिया वेळेत व शिस्तबद्ध पद्धतीने पूर्ण केल्याबद्दल प्रशालेच्या वतीने दोन्ही अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी प्रशालेचे प्राचार्य वसंतराव शेडगे आणि उच्च माध्यमिक विभागाचे उपप्राचार्य सोमनाथ माने यांच्या हस्ते गोपी जाधव व विशाल काकडे यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी प्राचार्य वसंतराव शेडगे यांनी विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी आणि सुरक्षित प्रवासासाठी फलटण आगाराने घेतलेल्या या सकारात्मक भूमिकेचे कौतुक केले. तसेच विद्यार्थिनींना वेळेत मोफत बस पास उपलब्ध करून दिल्याबद्दल राज्य परिवहन महामंडळाच्या फलटण आगारातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानून पुढील काळातही असेच सहकार्य मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली.
शाळेच्या माध्यमातूनच पास वितरणाची सुविधा उपलब्ध झाल्याने विद्यार्थिनी व पालकांना आगारात जाण्याची अतिरिक्त धावपळ टळावी यासाठी शाळा आणि शासकीय यंत्रणांमधील समन्वय महत्त्वाचा ठरला आहे.
या कार्यक्रमास परिवहन समितीचे उच्च माध्यमिक विभागाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर बोंद्रे, माध्यमिक विभागाचे अध्यक्ष चेतन बोबडे, भोईटे, सदस्य सुधाकर वाकुडकर, राजेंद्र गोडसे, श्रीकांत तावरे, सागर बोराटे, रणजीत नार्वेकर तसेच प्रशालेतील शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
