‘महारक्तदान शिबिराला’ नागरिकांनी अभूतपूर्व प्रतिसाद

६३६ रक्तदात्यांचे रक्तदान

। लोकजागर वृत्त । फलटण । १६ ऑगस्ट २०२६ ।

भारतीय स्वातंत्र्याच्या ८० व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून फलटणमध्ये एक नवा इतिहास रचला गेला आहे. तालुक्यातील विविध नामांकित सामाजिक संस्था आणि संघटनांच्या संयुक्त विद्यमाने १५ ऑगस्ट रोजी मुधोजी क्लबच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या ‘महारक्तदान शिबिराला’ नागरिकांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. स्वातंत्र्यदिनाचा उत्सव केवळ ध्वजवंदनापुरता मर्यादित न ठेवता ‘रक्तदान हेच श्रेष्ठ दान’ या भावनेतून तब्बल ६३६ रक्तदात्यांनी रक्तदान करून गरजूंना जीवनदानाचा संदेश दिला.

या सामाजिक व राष्ट्रीय उपक्रमाचे आयोजन सहयोग सोशल फाउंडेशन, रक्षक रयतेचा महिला सामाजिक फाउंडेशन, फलटण, नेचर अँड वाइल्डलाइफ वेल्फेअर सोसायटी, क्रांतीसूर्य प्रतिष्ठान, महात्मा शिक्षण संस्था, निसर्ग रक्षण व संवर्धन संस्था, फलटण या संस्थांनी एकत्र येऊन केले होते. त्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सकाळपासूनच युवक, युवती आणि नागरिकांनी रक्तदान करण्यासाठी शिबीरस्थळी गर्दी केली होती.

शिबीरस्थळी उभारण्यात आलेला ‘तिरंगी झेंड्याचा विशेष सेल्फी पॉईंट’ हा तरुण-तरुणींच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. रक्तदान केल्यानंतर या सेल्फी पॉईंटवर फोटो काढून देशभक्तीचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.

या सामाजिक सोहळ्याला राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी भेटी देऊन उपक्रमाचे विशेष कौतुक केले. त्यामध्ये माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे, जिल्हा बँक संचालक शिवरूपराजे खर्डेकर, पंचायत समिती उपसभापती अमोल सस्ते, आयडियल इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या वैशाली शिंदे, तसेच विविध शासकीय अधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.

शिबिरादरम्यान रक्षक रयतेचा महिला सामाजिक फाउंडेशन फलटण अंतर्गत ‘रक्षक रयतेचा इव्हेंट टीम’च्या वतीने आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंतांचा संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल धिरज कचरे आणि कर्तव्यदक्ष व आदर्श गृहिणी म्हणून सविताताई तात्यासाहेब गायकवाड यांचा सन्मान करण्यात आला.

६३६ बाटल्या रक्त संकलित करून गरजू रुग्णांना जीवनदान देणारे हे शिबीर फलटणच्या सामाजिक एकतेचे आणि वैचारिक प्रगल्भतेचे उत्तम उदाहरण ठरले आहे.

Spread the love