साखरवाडीतील ‘ती’ टीका अक्षम्य, संस्कृती कुठे गेली? : रणजितसिंहांचा प्रहार

नीरा-देवधरच्या पाण्यामुळेच खासदारकीच्या पराभवाची किंमत मोजल्याचा दावा.

। लोकजागर वृत्त । फलटण । १९ ऑगस्ट २०२६ ।

रामराजेंच्या शिव्यांकडे मी लक्ष देणार नाही. पण साखरवाडीत बोलताना त्यांनी मुली-बाळींवर घाणेरडी टीका केली, ती त्यांची चूक अक्षम्य आहे. त्यांचा सुसंस्कृतपणा कुठे गेला? कार्यकर्त्यांना षंढ म्हणाले आणि तरीही ते ऐकून घेतात; त्यांच्या कार्यकर्त्यांनाही स्वाभिमान नाही, अशा शब्दांत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी जोरदार हल्लाबोल केला.

श्रीराम कारखान्याच्या अनुषंगाने साखरवाडी (ता. फलटण) येथे रामराजे नाईक निंबाळकर यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या प्रसंगी आमदार सचिन पाटील, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, नरसिंह निकम, युवा नेते अमरसिंह नाईक निंबाळकर, जयकुमार शिंदे आणि रणजितसिंह भोसले यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत बोलताना रणजितसिंह नाईक निंबाळकर पुढे म्हणाले, “माझ्या पोलिस संरक्षणावर ते बोलत आहेत. कुठेही बोलवा, मी एकटा यायला तयार आहे. ते रेल्वेवर टीका करत असून तालुक्यात नकारात्मकता पसरवत आहेत. माझा स्वराज कारखाना मी स्वतःच्या हिमतीवर काढला आहे आणि त्याचे विस्तारीकरण सुरू आहे; त्यासाठी मी कुणाकडूनही रुपया घेतला नाही. आमची डेअरीही आम्ही स्वतःच्या हिमतीवर चालवली होती. ३० वर्षे अडकून राहिलेले नीरा-देवधरचे पाणी आपण पुढे आणले आणि यातूनच मी खासदारकीच्या पराभवाची किंमत मोजली आहे. तालुक्यात भाजपमध्ये मोठे प्रवेश होणार आहेत हे समजल्यामुळेच त्यांच्याकडून अफवा उठवल्या जात आहेत.”

सचिन पाटील म्हणाले, “साखरवाडीच्या कन्येवर केलेली टीका अत्यंत निषेधार्ह आहे. सभापती योग्य पद्धतीने प्रशासन हाताळत आहेत, त्यांच्यावर वापरलेले शब्द निषेधार्ह आहेत. आम्ही सकारात्मक राहून तालुका वेगळ्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न करत आहोत, मात्र ते नकारात्मकता पसरवत आहेत. २२ वर्षे लाल दिवा भोगून ज्यांना जमले नाही ते रणजितदादांनी केले, हेच त्यांना बघवत नाही.”

समशेरसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, “सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी वयाच्या २२ व्या वर्षी सभापती झाली आहे. त्या मुलीच्या विरोधात काढलेले अपशब्द ही कुठली संस्कृती आहे? आम्ही नेहमीच रामराजे यांच्या वयाचा मान ठेवला आहे, पण ते सर्वसामान्य कन्येवर बोलल्यामुळेच आज आम्हाला बोलायची वेळ आली आहे. त्यांच्या अशा बोलण्याने तालुक्याचे नाव खराब होत आहे.”

नरसिंह निकम यांनी श्रीराम कारखान्याच्या मुद्द्यावरून निशाणा साधताना सांगितले की, “त्यांनी श्रीराम कारखान्याकडे केवळ व्यवसाय म्हणून पाहिले आणि कारखाना भाडेतत्त्वावर (खंडाने) चालवायला दिला. त्यांनी कर्मचारी आणि सभासदांच्या डोक्यावर तब्बल २१५ कोटी रुपयांच्या कर्जाचा बोजा लादला आहे.”

Spread the love