नगरसेविका सिद्धाली शहा यांच्या हस्ते विशेष सत्कार
। लोकजागर वृत्त । फलटण । ३ ऑक्टोबर २०२६ ।
पुणे येथील टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून ‘मास्टर ऑफ फिजिओथेरपी’ या पदव्युत्तर पदवी परीक्षेत संपूर्ण विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल फलटणची सुकन्या तनुजा राजेंद्र आहेरराव हिचा फलटण नगरपरिषदेच्या नगरसेविका सिद्धाली अनुप शहा यांनी विशेष सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तनुजा राजेंद्र आहेरराव यांनी नुकत्याच झालेल्या मास्टर ऑफ फिजिओथेरपी या परीक्षेत तब्बल ८० टक्के इतके घसघशीत गुण प्राप्त करून विद्यापीठ स्तरावर पहिला क्रमांक मिळवण्याची कामगिरी केली आहे.
तनुजा आहेरराव यांच्या या यशाची दखल घेत नगरसेविका सिद्धाली शहा यांनी त्यांची भेट घेऊन त्यांचा यथोचित सन्मान केला. या सत्कारप्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना सिद्धाली शहा म्हणाल्या की, तनुजा आहेरराव यांना मिळालेले हे घवघवीत यश म्हणजे फलटणच्या शिरपेचात खोवलेला एक मानाचा तुरा आहे. त्यांनी अत्यंत कष्टाने आणि जिद्दीने मिळवलेले हे विद्यापीठ स्तरावरील यश संपूर्ण फलटणकरांसाठी खऱ्या अर्थाने खूप अभिमानास्पद आहे. यावेळी सिद्धाली शहा यांनी तनुजा आहेरराव यांचे या अद्वितीय यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन केले आणि त्यांच्या वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील पुढील उज्ज्वल वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी नगरसेवक अनुप शहा, सिद्धांत शहा, आहेरराव कुटुंबीय उपस्थित होते.
