राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये अधिकृत दुष्काळ जाहीर; १६ ऑक्टोबरपासून १० टक्के पाणीकपात लागू करण्याचा शासनाचा निर्णय.
। लोकजागर वृत्त । फलटण । १४ ऑक्टोबर २०२६ ।
महाराष्ट्र शासनाने राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये म्हणजेच सुमारे ७४ टक्के भागात अधिकृतपणे दुष्काळ जाहीर केला आहे. हा नेहमीचा उन्हाळ्यातील एप्रिल किंवा मे महिन्याचा १-२ महिन्यांचा तुटवडा नसून ऑक्टोबर महिना सुरू आहे. मान्सून संपत आला असतानाच पावसाच्या भीषण तुटवड्यामुळे आतापासूनच संपूर्ण महाराष्ट्राला पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. आगामी ८ महिने पाण्याविना काढणे अत्यंत कठीण जाणार असल्याने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शासनाने १६ ऑक्टोबर २०२६ पासून सर्व नागरी आणि ग्रामीण भागात किमान १० टक्के पाणीकपात लागू करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सर्व फलटणकरांनी आजपासूनच पाणी बचतीचे सोपे उपाय अंमलात आणावेत आणि पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करावा, असे कळकळीचे आवाहन फलटण नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक आठच्या नगरसेविका सिद्धाली अनुप शहा यांनी फलटण शहरातील नागरिकांना केले आहे.
घर, गॅलरी किंवा टेरेस धुण्यासाठी पाण्याचा पाईप न वापरता फक्त ओल्या फडक्याने पुसून घ्यावे, अंघोळीसाठी शॉवर अथवा नळ सतत चालू न ठेवता फक्त एका बादली पाण्याचा वापर करावा, तसेच भांडी घासताना किंवा कपड्यांना साबण लावत असताना नळ चालू ठेवू नये, असे नगरसेविका सिद्धाली शहा यांनी सूचवले आहे. कपडे रोज थोडे थोडे धुण्याऐवजी वॉशिंग मशीन पूर्ण भरल्यावरच लावावी, वाहने धुण्यासाठी पाण्याचा वापर पूर्णपणे थांबवून कोरड्या किंवा ओल्या कपड्याने गाड्या पुसून घ्याव्यात आणि टॉयलेट फ्लशचा वापर गरजेपुरताच करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. भाजी किंवा तांदूळ धुतलेले पाणी फेकून न देता झाडांना टाकावे तसेच झाडांना गरजेपुरतेच पाणी फक्त सकाळी किंवा संध्याकाळी द्यावे. दुष्काळ फक्त शेतकऱ्यांसाठी नसून त्याचे परिणाम सर्वांनाच भोगावे लागतात, कारण अन्न, धान्य आणि पिण्याच्या पाण्यासाठी आपण सर्वजण एकमेकांवर अवलंबून आहोत, हे लक्षात ठेवून सर्व नागरिकांनी पाणी बचतीचे संकल्प तातडीने अमलात आणावेत, असे सिद्धाली शहा यांनी स्पष्ट केले.
