विविध शाळा व डान्स अकॅडमीच्या कलाकारांच्या आकर्षक नृत्याविष्काराने महोत्सव दुमदुमला;
स्वयंसिद्धा संस्था समूहाच्या प्रमुख अॅड.सौ. मधुबाला भोसले यांच्या हस्ते विजेत्यांचा गौरव.
। लोकजागर वृत्त । फलटण । २५ ऑक्टोबर २०२६ ।
श्री सद्गुरू प्रतिष्ठान आयोजित ‘फलटण फेस्टिव्हल २०२६’ च्या दुसऱ्या दिवशी श्री सद्गुरू हरिबुवा महाराज नगरी (यशवंतराव चव्हाण हायस्कूल प्रांगण) येथे रंगलेल्या अत्यंत आकर्षक ग्रुप डान्स कॉम्पिटिशनला फलटणकरांचा अभूतपूर्व व उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. फलटणकरांसाठी सांस्कृतिक मेजवानी घेऊन आलेल्या या महोत्सवातील ग्रुप डान्स कॉम्पिटिशनचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने संपन्न झाला. याप्रसंगी चंदूकाका सराफ अँड सन्स फलटण शाखा व्यवस्थापक श्रीनिवास सूर्यवंशी, फलटण फेस्टिव्हलचे अध्यक्ष दिलीपसिंह भोसले, कार्याध्यक्ष रणजितसिंह भोसले, उपाध्यक्ष रवींद्र बेडकीहाळ, श्री सद्गुरू हरिबुवा महाराज नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन तेजसिंह भोसले, श्रीराम बझारचे संचालक जयकुमार शिंदे, धनंजय पवार, श्री सद्गुरू व महाराजा उद्योग समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप जगताप, प्रवीण पवार, निखिल मोरे आणि अमित कांबळे आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते.
अतिशय चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत सातारा येथील आकाश कला केंद्रच्या कलाकारांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले, तर फलटणच्या नृत्य कला अकॅडमीने द्वितीय क्रमांक आणि अल्फा ग्रुप, फलटणने तृतीय क्रमांक प्राप्त केला. स्पर्धेदरम्यान सहभागी कलाकारांनी अत्यंत उत्कृष्ट आणि डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या नृत्यांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. या स्पर्धेसाठी पुणे येथील कल्चरल आर्टिस्ट तथा डान्स कोरिओग्राफर प्रा. गणेश उपाध्याय आणि बारामती येथील कलाकार व डायरेक्टर सनी पवार यांनी परीक्षण केले. या डान्स कॉम्पिटिशनमध्ये सहकार महर्षी हणमंतराव पवार हायस्कूल, आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालय, श्रीराम विद्याभवन प्राथमिक शाळा, निशिताज डान्स अकॅडमी, ओरा गर्ल्स ग्रुप, अल्फा ग्लर्स ग्रुप, श्रीमंत लक्ष्मीदेवी मा. नाईक निंबाळकर नगर परिषद शाळा क्र. ८, डिम्स फ्लाय डान्स, व्हिक्ट्री डान्स अकॅडमी, आकाश कला केंद्र सातारा, नृत्य कला अकॅडमी फलटण आणि गणेश ग्रुप आदी नामांकित प्रशाला व डान्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होत आपला जबरदस्त उत्साह दाखवला.

स्पर्धेतील सर्व विजयी व सहभागी गुणवंत कलाकारांना स्वयंसिद्धा संस्था समूहाच्या प्रमुख अॅड.सौ. मधूबाला भोसले यांच्या प्रमुख हस्ते सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार वितरण सोहळ्यास फलटण नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा सौ. प्रियदर्शनी भोसले, नगरसेविका सौ. रुपाली सस्ते, स्वयंसिद्धाच्या कल्चरल ग्रुप च्या संचालिका, सौ. राजस भोईटे,सौ. अलका बेडकीहाळ आणि सौ. स्वाती फुले आदी महिला मान्यवर उपस्थित होत्या. सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेण्यासाठी आणि दर्जेदार नृत्याविष्कार डोळ्यांखाली सामावून घेण्यासाठी फलटणकरांनी या स्पर्धेदरम्यान महोत्सवाच्या प्रांगणात प्रचंड गर्दी केली होती.
