‘फलटण फेस्टिव्हल २०२६’ मध्ये रंगलेल्या होम मिनिस्टर पैठणी शो मध्ये पूजा म्हेत्रे ठरल्या मानकरी

रमेश परळीकर यांच्या निवेदनाने महिलांमध्ये उडाला धिंगाणा

। लोकजागर वृत्त । फलटण । २६ ऑक्टोबर २०२६ ।

श्री सद्गुरू प्रतिष्ठान आयोजित ‘फलटण फेस्टिव्हल २०२६’ च्या तिसऱ्या दिवशी पार पडलेल्या भव्य ‘होम मिनिस्टर पैठणी शो’ चा हजारो महिला भगिनींनी अत्यंत उत्साहात आनंद लुटला. या अतिशय लोकप्रिय खेळात चुरशीची स्पर्धा होत पैठणी साडी जिंकण्याचा बहुमान पूजा म्हेत्रे यांनी पटकावला, तर संध्या गायकवाड यांना द्वितीय क्रमांकाची आकर्षक पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले. पहिल्या दहा स्पर्धकांना साडी गिफ्ट देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाचा प्रांरभ प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. प्रसाद जोशी आणि ए. बी. ज्वेलर्सच्या संचालिका सौ. सारिका शहाणे यांच्या प्रमुख हस्ते दीपप्रज्वलनाने संपन्न झाला. याप्रसंगी स्वयंसिद्धा उद्योग समूहाच्या अध्यक्षा अ‍ॅड. सौ. मधूबाला भोसले, फलटण नगरीच्या उपनगराध्यक्षा सौ. प्रियदर्शनी भोसले, स्वयंसिद्धाच्या संचालिका सौ. मृणालिनी भोसले, सौ.राजस भोईटे, सौ ऐश्वर्या नाईक निंबाळकर,सौ. मयुरा गांधी, नगरसेविका सौ. रुपाली सस्ते आणि सौ. सुपर्णा आहिवळे, सौ अनुराधा गोडसे, सौ. स्वाती फुले आदी महिला मान्यवर उपस्थित होत्या.

या विशेष ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोकप्रिय मराठी चित्रपट अभिनेते तथा प्रसिद्ध निवेदक रमेश परळीकर यांनी अत्यंत दिलखुलास आणि दणकेबाज शैलीत केले. त्यांच्या अस्सल विनोदी आणि मनमोकळ्या सादरीकरणामुळे संपूर्ण कार्यक्रमात कमालीची रंगत आली होती. कार्यक्रमादरम्यान खेळवण्यात आलेले तळ्यात मळ्यात, फास्ट फिंगर, झटपट उत्तरे आणि मजेशीर उखाणे यांसारख्या विविध गेममुळे उपस्थित महिला भगिनींचा उत्साह द्विगुणित झाला होता. पैठणी जिंकण्याच्या उत्सहात महिलांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी करत या अनोख्या कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद घेतला.

Spread the love