मसाप शाहूपुरी शाखेच्या वतीने जिल्हास्तरीय साहित्यिक पुरस्कारांचे थाटात वितरण; विविध साहित्यिकांचा गौरव.
। लोकजागर । सातारा / फलटण । २१ मे २०२६ ।
“लेखक कधीही मरत नसतो, तर तो आपल्या पुस्तकाच्या रूपाने समाजात नेहमी जिवंत राहतो. म्हणूनच, सर्व साहित्यिकांनी नेहमी परखडपणे आणि वास्तववादी लिखाण केले पाहिजे. त्यासोबतच आपल्या मातृभाषेचे सौंदर्य जपायला हवे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक आ. दि. बा. पाटील यांनी केले. महाराष्ट्र साहित्य परिषद (मसाप) पुणे, शाखा शाहूपुरीच्या वर्धापनदिनानिमित्त साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या साहित्यिकांना जिल्हास्तरीय साहित्यिक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. सातारा येथील नगर वाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये संपन्न झालेल्या या सोहळ्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
या दिमाखदार सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, ज्येष्ठ साहित्यिक किशोर बेडकिहाळ, विनोद कुलकर्णी आणि डॉ. राजेंद्र माने यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हास्तरीय साहित्यिक पुरस्कारांचे मसाप शाहूपुरी शाखेचे यंदाचे हे दुसरे वर्ष आहे. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली. मान्यवरांचे स्वागत किशोर बेडकिहाळ यांनी केले, तर प्रास्ताविकातून डॉ. राजेंद्र माने यांनी शाहूपुरी शाखेच्या साहित्यिक उपक्रमांची माहिती दिली. विनोद कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतातून, जिल्ह्यातील साहित्यिकांना प्रोत्साहन देण्यासाठी या पुरस्कारांचे आयोजन अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले.
या मान्यवर साहित्यिकांचा झाला गौरव: या सोहळ्यात विविध साहित्य प्रकारांतील उत्कृष्ट ग्रंथांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये शंभूपुत्र छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्यावरील चरित्र ग्रंथासाठी ग्रंथकार डॉ. पी. एन. शिंदे यांना ‘बेबीताई कांबळे चरित्र पुरस्कार’, ॲड. शंकर निकम यांच्या ‘गैरसमजाच्या विळख्यातील नेहरू’ या पुस्तकाला ‘रा. ना. चव्हाण वैचारिक ग्रंथ पुरस्कार’ आणि मा. रामकली पावसकर यांच्या ‘नीरव किनाऱ्यावर’ या काव्यसंग्रहाला ‘कवी बा. सी. मर्ढेकर कविता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. तसेच, ॲड. सीमंतिनी नूलकर यांच्या ‘फुलांचे जंगली प्रदेश’ या पुस्तकास ‘वासंती मुजुमदार संकीर्ण साहित्य पुरस्कार’, प्रा. सुभाष गुरव यांच्या ‘ठिणग्या’ कथासंग्रहाला ‘प्रा. अजित पाटील पुरस्कार’, फलटणचे ज्येष्ठ पत्रकार-साहित्यिक रवींद्र बेडकिहाळ यांनी लिहिलेल्या ‘बाळशास्त्री जांभेकर’ यांच्यावरील त्रिखंडात्मक चरित्रात्मक ग्रंथाला ‘विशेष साहित्यिक पुरस्कार’, तर ज्येष्ठ साहित्यिक व. बा. बोधे यांना ‘श्री छ. प्रतापसिंह थोरले महाराज ज्येष्ठ साहित्यिक पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर सर्व विजेत्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ज्येष्ठ साहित्यिक व. बा. बोधे यांनी नवलेखकांना संदेश देताना, लेखकांनी लिहिताना सखोल अभ्यास करून आणि सातत्याने लिहिले पाहिजे, असे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष दि. बा. पाटील यांनी सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करत शाहूपुरी शाखेच्या कार्याचे विशेष कौतुक केले. या कार्यक्रमास मसाप सांगली जिल्हा प्रतिनिधी स्वामी, श्रीधर साळुंखे, डॉ. संदीप श्रोत्री, प्रदीप कांबळे, मुकुंद फडके, विद्या पोळ, राजश्री शाह, श्रीराम नानल यांसह मसापचे अजित साळुंखे, सचिन सावंत, वजीर नदाफ, संजय माने आणि चंद्रकांत कांबिरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार नंदकुमार सावंत यांनी मानले, तर नेटके सूत्रसंचालन सविता कारंजकर यांनी केले.
