छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मालोजीराजे पुतळा परिसरात गर्दीची शक्यता; नागरिकांनी सहकार्य करण्याचे मुख्याधिकाऱ्यांचे आवाहन.
। लोकजागर । फलटण । १६ एप्रिल २०२६ ।
रविवार, दिनांक १९ एप्रिल २०२६ रोजी साजरी होणारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि त्यानिमित्त निघणारी भव्य मिरवणूक लक्षात घेता, फलटण नगरपरिषदेने शहरातील आठवडी बाजाराच्या ठिकाणी तात्पुरता बदल केला आहे. मिरवणुकीच्या मार्गावर होणारी संभाव्य गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला असून नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी केले आहे.
बाजाराचे नवीन ठिकाण: शिवजयंतीनिमित्त शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, महात्मा फुले चौक आणि मालोजीराजे पुतळा या परिसरात नागरिकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, रविवारी भरणारा आठवडी बाजार आता नियमित ठिकाणाऐवजी गिरवी नाका ते शासकीय विश्रामगृह ते बी.एस.एन.एल. ऑफिस रोड (कामगार वसाहत) या ठिकाणी भरवण्यात येणार आहे.
प्रशासकीय सूचना: शहरातील आणि शहरालगतच्या पंचक्रोशीतील नागरिकांनी तसेच व्यापाऱ्यांनी या बदलाची नोंद घेऊन नगरपरिषदेला सहकार्य करावे, अशी विनंती जाहीर आवाहनाद्वारे करण्यात आली आहे. मिरवणूक मार्ग मोकळा राहावा आणि वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी हा बदल करण्यात आला आहे.
