माणसासारखीच झाडांमधील ‘झाडूसकी’ जपा; रानकवी राहुल निकम यांचे प्रभावी प्रतिपादन

पाडेगाव सामाजिक विकास फाउंडेशनच्या वतीने महापुरुषांची संयुक्त जयंती साजरी; रानकवी राहुल निकम यांना ‘साहित्य रत्न’ पुरस्कार प्रदान.

। लोकजागर । फलटण । १७ एप्रिल २०२६ ।

“माणूस हा निसर्गाशी घट्ट जोडलेला असून आपण निसर्गाला देव मानतो. निसर्गातील प्रत्येक प्राणी आणि वनस्पतीची आपण पूजा करतो. ज्याप्रमाणे माणसात माणुसकी आवश्यक आहे, त्याचप्रमाणे झाडांमधली ‘झाडूसकी’ जपणेही तितकेच महत्त्वाचे आहे. हिरवा श्वास देणाऱ्या निसर्गाची आणि झाडांची काळजी घेणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे,” असे प्रतिपादन वाई परिक्षेत्राचे नियतक्षेत्र वनाधिकारी तथा रानकवी राहुल निकम यांनी केले.

पाडेगाव सामाजिक विकास फाउंडेशनच्या वतीने आयोजित ‘महापुरुषांच्या जयंती’ कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी रानकवी राहुल निकम यांना त्यांच्या साहित्यिक योगदानाबद्दल ‘साहित्य रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या काव्य सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.

प्रबोधनाची चळवळ महाराष्ट्रभर पोहोचावी – प्रा. विकास शिंदे

कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले प्रा. विकास शिंदे यांनी फाउंडेशनच्या कार्याचे विशेष कौतुक केले. “पाडेगाव सामाजिक विकास फाउंडेशनचा हा मंच खऱ्या अर्थाने प्रबोधन करणारा मंच आहे. सर्व महापुरुषांच्या जयंती एकाच व्यासपीठावर साजऱ्या करून समता, शिक्षण आणि संविधानाचे मूल्य जपण्याचे काम येथे केले जाते. ही प्रबोधनाची चळवळ संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचायला हवी,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा परिषद सदस्य गिरीश बनकर यांनी केले. त्यांनी फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. या कार्यक्रमास पाडेगाव परिसरातील महिला, युवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love