श्रीमंत संजीवराजेंच्या एन्ट्रीने पक्षाला ‘दहा हत्तींचे बळ’
। लोकजागर । फलटण । ३ मे २०२६ ।
मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाचे (SIR) काम सुरू होत असून, या अंतर्गत पक्षातर्फे बूथ लेव्हल एजंट (BLA) नेमण्याची जबाबदारी माढा लोकसभा मतदारसंघात पूर्ण झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात या प्रक्रियेत माढा लोकसभा मतदारसंघ सध्या आघाडीवर असल्याची महत्त्वपूर्ण माहिती शिवसेना माढा लोकसभा संपर्कप्रमुख पै. चंद्रहार पाटील यांनी दिली. फलटण येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
शंभर शाखांचे उद्दिष्ट आणि ‘भगवा सप्ताह’: येत्या ११ ते १७ मे या कालावधीत फलटण विधानसभा मतदारसंघात ‘भगवा सप्ताह’ राबवण्यात येणार असून, यादरम्यान १०० नवीन शिवसेना शाखा सुरू करण्याचा निर्धार पक्षाने केला आहे. सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेची बांधणी अत्यंत वेगाने केली जात आहे. “येत्या काळात सातारा जिल्ह्यात ५ ते ६ आमदार आणि इथले दोन्ही खासदार शिवसेनेचे झाले पाहिजेत,” हा विचार घेऊन पक्षाचे संघटन मजबूत करत असल्याचे पै. चंद्रहार पाटील यांनी स्पष्ट केले.
संजीवराजेंच्या नेतृत्वामुळे पक्षाला बळ: सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यामुळे शिवसेनेला या भागात ‘दहा हत्तींचे बळ’ मिळालेले आहे, असे उद्गार चंद्रहार पाटील यांनी काढले. त्यांच्या सक्रिय सहभागामुळे आगामी निवडणुकांमध्ये पक्षाची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
मान्यवरांची उपस्थिती: या पत्रकार परिषदेप्रसंगी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, शिवसेना नेते पै. संतोष (आबा) वेताळ, फलटण पंचायत समितीचे उपसभापती अमोल सस्ते यांच्यासह शिवसेनेचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्ह्याच्या राजकारणात शिवसेनेने आता आक्रमक पाऊले उचलण्यास सुरुवात केल्याचे यातून दिसून येत आहे.
