रुग्णांनो औषध साठा करून ठेवा ! २० मे रोजी देशव्यापी बंदमुळे फलटणमधील औषध विक्री राहणार ठप्प

फलटण तालुक्यातील केमिस्ट बांधव आंदोलनात सामील होणार

। लोकजागर । फलटण । ९ मे २०२६ ।

ऑनलाईन औषध विक्री आणि कॉर्पोरेट कंपन्यांकडून दिल्या जाणार्‍या अव्यवसायिक सवलतींच्या निषेधार्थ ’ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट’ संघटनेने देशव्यापी बंदची हाक दिली आहे. या निर्णयानुसार येत्या बुधवार, दिनांक २० मे रोजी फलटण शहरासह संपूर्ण तालुक्यातील औषध विक्रेते आपली दुकाने बंद ठेवून एक दिवसाचे लाक्षणिक आंदोलन करणार आहेत. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुकारण्यात आलेल्या या आंदोलनामुळे तालुक्यातील औषध पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

या आंदोलनाच्या प्रमुख मागण्यांमध्ये ऑनलाईन औषध विक्री पूर्णपणे बंद करणे, २८ ऑगस्ट २०१८चा संबंधित निर्णय मागे घेणे, कार्पोरेटद्वारे देण्यात येणारा अव्यवसायिक डिस्काउंट बंद करणे आणि बनावट औषधांपासून देशाला वाचवण्यासाठी २६ मार्च २०२० रोजीचा शासन निर्णय रद्द करणे यांचा समावेश आहे. केंद्र सरकारने या मागण्यांकडे त्वरित लक्ष न दिल्यास आगामी काळात हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा केमिस्ट बांधवांनी दिला आहे. २० मे चा बंद ही केवळ एक सुरुवात असून, मागण्या मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरून लढा देण्याची तयारी संघटनेने दर्शवली आहे.

दरम्यान, या बंदच्या पार्श्‍वभूमीवर रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून स्थानिक पातळीवर विशेष काळजी घेण्यात आली आहे. सातारा जिल्हा अध्यक्ष सागर पाटील, महाराष्ट्र स्टेट केमिस्ट असोसिएशनचे सदस्य राहुल मोहिते, फलटण तालुका अध्यक्ष संग्राम धुमाळ आणि उपाध्यक्ष रणजीत कदम यांनी तालुक्यातील औषध विक्रेत्यांची बैठक घेऊन या बंदचे नियोजन केले आहे. रुग्णांनी आपल्या आवश्यक औषधांचा साठा आधीच करून ठेवावा, असे आवाहन करण्यात आले असले तरी, अतितातडीच्या आणि अत्यावश्यक औषध पुरवठ्यासाठी तालुक्यातील दोन प्रमुख ठिकाणी सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रशासनाने आणि केंद्र सरकारने या देशव्यापी प्रश्‍नावर ठोस तोडगा काढावा, अशी मागणी केमिस्ट असोसिएशनने केली आहे.

Spread the love