कर्मवीर अण्णांचे विचार आजच्या पिढीने आचरणात आणावेत; डॉ. सचिन सूर्यवंशी-बेडके यांचे प्रतिपादन

श्रीराम एज्युकेशन सोसायटीमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांचा ६७ वा स्मृतीदिन संपन्न.

। लोकजागर । फलटण । १० मे २०२६ ।

आजच्या तरुण पिढीने कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शैक्षणिक आणि सामाजिक विचार केवळ वाचून न थांबता ते प्रत्यक्ष आचरणात आणून पुढे घेऊन जावेत, अशी अपेक्षा श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) यांनी व्यक्त केली. श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल, नामदेवराव सूर्यवंशी महाविद्यालय आणि सौ. वेणूताई चव्हाण डी. फार्मसी कॉलेज या चारही शाखांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ६७ व्या स्मृतीदिन कार्यक्रमात ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके), संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य शिवाजीराव सूर्यवंशी (बेडके) आणि महेंद्र सूर्यवंशी (बेडके) यांच्या हस्ते कर्मवीर अण्णांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी पत्रकार मुगुटराव कदम यांची विशेष उपस्थिती होती. डॉ. सचिन सूर्यवंशी यांनी आपल्या मनोगतातून श्रीराम एज्युकेशन सोसायटी आणि कर्मवीर अण्णा यांच्यातील जुन्या ऋणानुबंधांना उजाळा दिला, तसेच अण्णांच्या कार्याबद्दलच्या अनेक आठवणींना उजाळा देत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

प्रास्ताविक आणि शिक्षक मनोगतातून प्रा. एस. डी. यादव यांनी अण्णांच्या जीवनातील विविध शैक्षणिक आणि सामाजिक प्रसंग सांगून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. या कार्यक्रमाला संस्थेच्या सर्व शाखांचे प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन प्राचार्य सौ. एन. एम. गायकवाड, उपप्राचार्य पी. डी. घनवट आणि पर्यवेक्षिका सौ. सी. आर. गायकवाड यांनी केले. प्रा. एस. डी. यादव यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रा. एस. एन. राऊत यांनी आभार मानले.

Spread the love