साताऱ्यात आजपासून १५ वे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाचे रणशिंग; क्रांतीनगरीत विचारांचा जागर

पोवई नाक्यावरून भव्य मशाल रॅलीला सुरुवात; शाहीर संभाजी भगत यांच्या अध्यक्षतेखाली रंगणार सोहळा.

। लोकजागर । सातारा । ९ मे २०२६ ।

साताऱ्याच्या ऐतिहासिक भूमीत आजपासून १५ व्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाला मोठ्या उत्साहात सुरुवात होत आहे. ‘विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र’ आणि स्थानिक संयोजन समितीच्या वतीने आयोजित हे दोन दिवसांचे संमेलन सातारा शहरात क्रांतीचा नवा संदेश घेऊन आले आहे. आज सकाळी ९ वाजता पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून आणि पद्मश्री लक्ष्मण माने यांच्या हस्ते मशाल पेटवून या संमेलनाचे औपचारिक उद्घाटन व भव्य मिरवणुकीला सुरुवात झाली आहे.

ही मिरवणूक कर्मवीर भाऊराव पाटील पथ, राजपथावरून राजवाडा येथील थोरल्या प्रतापसिंह महाराजांना अभिवादन करून कला व वाणिज्य महाविद्यालयातील संमेलन स्थळी पोहोचणार आहे. या रॅलीमध्ये वारकरी संप्रदाय, आदिवासी ढोल पथक, विविध चित्ररथ आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले साहित्यिक, कलाकार व कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.

आजचे प्रमुख आकर्षण: संमेलनाचे मुख्य उद्घाटन नवी दिल्ली येथील ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. सोनाझरिया मिंझ यांच्या हस्ते होणार असून, सुप्रसिद्ध शाहीर संभाजी भगत हे संमेलनाचे अध्यक्षपद भूषवत आहेत. आज दुपारी ३ वाजता ‘मराठी धर्म’ या विषयावर विशेष परिसंवाद रंगणार आहे, ज्यामध्ये डॉ. शरद बाविस्कर, जावेद पाशा आणि उल्का महाजन यांसारखे विचारवंत आपले मत मांडतील.

सायंकाळच्या सत्रात निमंत्रितांचे कवी संमेलन आणि ‘विद्रोही रॅप’ संगीताचा कार्यक्रम होणार आहे. आजच्या दिवसाचे मुख्य आकर्षण म्हणजे रात्री ८ वाजता सादर होणारे ‘विश्ववंदनीय राजे शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ हे प्रसिद्ध नाटक. या संमेलनाच्या माध्यमातून सामाजिक समता आणि विद्रोहाचा आवाज बुलंद केला जात असून, सातारकरांनी आजच्या सर्व कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन स्वागताध्यक्ष डॉ. आ.ह. साळुंखे आणि संयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. सुहास फडतरे महाराज यांनी केले आहे.

Spread the love