फलटणमध्ये मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन; दर महिन्याच्या तिसऱ्या शुक्रवारी मिळणार सेवा

दिलीपसिंह भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सुवर्णसंधी; गरजूंना मोफत शस्त्रक्रियेचा लाभ मिळणार.

। लोकजागर । फलटण । १३ मे २०२६ ।

फलटण शहरातील सदगुरू व महाराजा उद्योग समूहाचे प्रमुख दिलीपसिंह भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सेवा सदन हॉस्पिटलच्या सहकार्याने फलटणकरांसाठी मोफत नेत्र तपासणी, शस्त्रक्रिया व भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी हा विशेष उपक्रम दर महिन्याच्या तिसऱ्या शुक्रवारी राबवला जाणार आहे. आरोग्य हीच खरी संपत्ती असून, जास्तीत जास्त नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन उद्योग समूहाच्या वतीने करण्यात आले आहे.

या शिबिरामध्ये डोळ्यांची सखोल तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया मार्गदर्शन तसेच इतर विविध आरोग्य तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली पूर्णपणे मोफत केली जाणार आहे. हे शिबीर दर महिन्याच्या तिसऱ्या शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत डी.एड. कॉलेज चौक शेजारील ‘महाराजा आयकॉन’, लक्ष्मीनगर, फलटण येथे संपन्न होईल. नागरिकांना एकाच छताखाली तज्ज्ञांचा सल्ला आणि उपचार मिळणार असल्याने ग्रामीण भागातील रुग्णांसाठी ही सोय अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

आपल्या परिसरातील गरजू व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांपर्यंत ही माहिती पोहोचवून त्यांना या उपक्रमात सहभागी करून घ्यावे, अशी विनंती संयोजकांनी केली आहे. दिलीपसिंह भोसले यांच्या नेतृत्वाखाली राबवल्या जाणाऱ्या या आरोग्यदायी उपक्रमाचे फलटण शहरात स्वागत होत असून, यामुळे अनेक गरजू रुग्णांना दृष्टी आणि आरोग्य लाभण्यास मदत होणार आहे. नागरिकांनी अधिक माहितीसाठी शिबिर स्थळी संपर्क साधावा.

Spread the love