निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांचे नागरिकांना आवाहन; मराठा-कुणबी नोंदी शोधणे व जात पडताळणी गतिमान करण्यासाठी पाऊल.
। लोकजागर । सातारा / फलटण । ३ जून २०२६ ।
मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थितीबाबत गठीत करण्यात आलेल्या राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या शिफारशींनुसार आणि नुकत्याच झालेल्या विविध आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर, सातारा जिल्हा प्रशासनाने अत्यंत गतिमान पावले उचलली आहेत. सातारा जिल्ह्यातील नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र मिळण्यात येणाऱ्या विविध तांत्रिक व प्रशासकीय अडीअडचणी तातडीने दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने एक विशेष हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्यात आला आहे.
राज्य शासनाच्या निर्देशानुसार मराठा-कुणबी जात प्रमाणपत्रे पात्र नागरिकांना तातडीने वितरित करण्यासाठी जुन्या महसुली व शैक्षणिक नोंदी शोधणे, जात प्रमाणपत्र मिळवणे, तसेच जात वैधता पडताळणी प्रमाणपत्र (Cast Validity) मिळवण्याबाबत नागरिकांना योग्य मार्गदर्शन करणे हा या हेल्पलाइनचा मुख्य उद्देश आहे. नागरिकांच्या अडीअडचणींचे जागेवरच निवारण करण्यासाठी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात ०२१६२-२३२१७५ (02162-232175) हा हेल्पलाइन नंबर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात आला आहे.
या विशेष हेल्पलाइन सुविधेचा सातारा जिल्ह्यातील व फलटण तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी, गरजू विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा आणि आपल्या दाखल्यांविषयी असणाऱ्या शंकांचे निरसन करून घ्यावे, असे अधिकृत आवाहन साताऱ्याचे निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाच्या या महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील निर्णयामुळे कुणबी दाखल्यांसाठी शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
