फलटणचा विकासरथ असाच पुढे धावणार; मंत्री जयकुमार गोरे

। लोकजागर वृत्त । फलटण । २ ऑगस्ट २०२६ ।

तालुक्याचा विकास गेली अनेक वर्षे राजकीय स्वार्थामुळे रखडला होता. आता फलटणमध्ये सुरू असलेला विकासरथ विरोधकांना पाहवत नसल्याने सातत्याने राजकारण केले जात आहे. राज्यातील सत्ता, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील बदललेले राजकीय समीकरण आणि लोकांचा वाढता पाठिंबा यामुळे फलटणच्या विकासाला आता कोणतीही अडचण येणार नाही, असे नमूद करून विरोधकांना आता आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली असल्याचे स्पष्ट मत राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले. फलटण येथील सभापती निवासस्थानाच्या नव्या इमारतीचा लोकार्पण सोहळा मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते पार पडला, त्या प्रसंगी ते बोलत होते.

या प्रसंगी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, प्रल्हादराव साळुंखे पाटील, दिलीपसिंह भोसले, सभापती शिवांजली भोसले, जिजामाला नाईक निंबाळकर, उपनगराध्यक्ष प्रियदर्शनी भोसले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे उपस्थित होते. या वेळी बोलताना मंत्री जयकुमार गोरे म्हणाले की, सत्ता, मंत्रीपदे, आमदारकी, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांसारखी सर्व पदे हातात असतानाही तालुक्याचा अपेक्षित विकास झाला नाही. मात्र आता परिस्थिती बदलली असून फलटणमध्ये विकासाची नवी दिशा निर्माण झाली आहे. विकासाला विरोध करणाऱ्यांना जनता योग्य उत्तर देत आहे. विरोधकांकडे अनेक वर्षे सत्ता असतानाही विकासाच्या दृष्टीने आवश्यक निर्णय झाले नाहीत. तीस वर्षे धूळ खात पडलेल्या इमारतीकडे त्यांचे लक्ष गेले नाही. मात्र आता इमारतीचे लोकार्पण होताच त्यावर स्वतःचा दावा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा दाव्यांना जनता बळी पडणार नाही.

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे जनसामान्यांमध्ये मिसळणारे, विकासाभिमुख नेतृत्व असल्याने फलटण शहरासह तालुक्यात विकासाची गती वाढल्याचा दावा त्यांनी केला. फलटणच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. मुख्यमंत्री सडक योजनेतून प्रारंभी १०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असून ग्रामीण रस्ते, विविध शासकीय कार्यालये, पंचायत समितीची कामे तसेच मूलभूत सुविधांसाठी आवश्यक तेवढा निधी दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. धुळदेव आणि बिरदेव देवस्थानांसाठी प्रत्येकी पाच कोटी रुपये, तर भिवाई मंदिरासाठी दोन टप्प्यांत पाच कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणाही त्यांनी या वेळी केली. विविध निवडणुकांमुळे गेल्या वर्षभरात अपेक्षित वेळ देता आला नाही. मात्र आता फलटणच्या विकासासाठी पूर्ण ताकदीने काम करणार आहे. विरोधकांनी अनेक वर्षांत जेवढी कामे केली नाहीत, त्यापेक्षा अधिक विकासकामे पुढील पाच वर्षांत उभी करू, असा विश्वास मंत्री गोरे यांनी व्यक्त केला. तसेच गेल्या निवडणुकीत आपला पराभव करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले, परंतु सत्याचा विजय होतो; जे स्वप्न आपण पाहिले होते ते रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पूर्ण केले, त्यामुळे त्यांना पुन्हा खासदार झालेले पाहायचे आहे, असेही ते म्हणाले.

या वेळी बोलताना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले की, तत्कालीन मंत्री गिरीश महाजन यांनी मंजूर केलेली ही देखणी इमारत फलटण शहरात उभी राहिली. विरोधकांची सातत्याने पराभवाची मालिका सुरू असल्याने आता शिव्या शाप देण्याशिवाय त्यांच्याकडे काम उरलेले नाही. स्व. चिमणराव कदम यांच्यानंतर काहीही काम झाले नाही, आमदार सचिन पाटील यांनी गेल्या तीन वर्षांत अडथळे असूनही हे काम पूर्ण केले. फलटण शहरासह तालुका रस्ते, पाणी, वीज दृष्टीने विकसित करण्यासाठी १०० टक्के निधी मिळाला आहे. शहरातील चारही बाजूंचे रस्ते सिमेंट काँक्रिटीकरणाने पूर्ण झाले असून आता ग्रामीण भागातील रस्ते सिमेंट काँक्रिटचे करायचे आहेत. बाणगंगा नदी बांधून घेऊन देखणी बनवणे आणि सर्व प्रकारची शासकीय कार्यालये आणून शहराचा दर्जा सुधारण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

आमदार सचिन पाटील म्हणाले की, स्व. चिमणराव कदम यांचे कामकाज या सभापती निवासस्थानातून चालत होते. ३० वर्षांपूर्वी सत्तांतर झाले, तेव्हापासून सर्व सत्ता आणि दोन आमदार असताना विरोधकांना सभापती निवास बांधता आले नाही. २०२० चे पत्र दाखवून जनतेची दिशाभूल केली जात आहे. परंतु जयकुमार गोरे आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील जनतेने बदल घडवून आणला आणि ३० वर्षांनंतर ही इमारत पूर्णत्वास गेली. भाजपच्या काळातच या कामाला मंजुरी मिळाली आहे. तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्व रस्ते सिमेंट काँक्रिटचे करून द्यावेत, अशी मागणी त्यांनी या वेळी केली. या कार्यक्रमास नगरसेवक रोहित नागटिळे, संदीप चोरमले, सनी अहिवळे, जयकुमार शिंदे, अमित भोईटे, बापूराव शिंदे, मिलिंद नेवसे, रामभाऊ ढेकळे, विश्वासराव भोसले उपस्थित होते. सभापती शिवांजली भोसले यांनी स्वागत केले, तर गटविकास अधिकारी अक्षय घावटे यांनी प्रास्ताविक केले.

Spread the love