। लोकजागर वृत्त । फलटण । ३१ जुलै २०२६ ।
प्रभाग 8 मधील जवानाच्या बोर्डला हात लावला तर तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा वजा विनंती अनुप शहा यांनी पालिका प्रशासनाला केली आहे. राजकीय फलक जरूर काढावेत, पण देशसेवा करणार्या जवानाला कुठलाही पक्ष नसतो; त्यामुळे अशा व्यक्तीचा बोर्ड काढण्याची हिम्मत करू नये, असे अनुप शहा यांनी स्पष्ट केले. शिवसेनेच्या वतीने प्रभाग 8 मधील नगरपालिका मंजूर कामांच्या फ्लेक्स बोर्डविरोधात पालिका प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. त्या निवेदनाला अनुसरून आपली भूमिका मांडताना ते बोलत होते.
शिवसेनेची तक्रार ही प्रभाग 8 मधील राजकीय भूमिका असू शकेल असे सुरुवातीला वाटले होते, तथापि नंतर हा राजकीय फ्लेक्सचा विषय नसल्याचे लक्षात आले. तसा विषय असता तर तेथील भाजपच्या नगरसेवकांच्या नावाचा उल्लेख त्यामध्ये आला असता. त्यामुळे हा विषय शिवसेनेच्या अंतर्गत राजकारणाचा असावा, असा दावाही अनुप शहा यांनी केला. शिवसेनेचे आजी – माजी पदाधिकारी यांच्या सुपुत्राची सैन्यदलात निवड झाली असून, खडतर परिश्रम पूर्ण करून देशसेवेला जाण्यापूर्वी तो फलटणला येत असताना त्यांच्या मित्रपरिवाराने त्याचे स्वागत केले होते आणि स्वागताचा फ्लेक्स लावला होता. परंतु शिवसेनेच्या काही लोकांना हे यश बघवले नाही, असा आरोप अनुप शहा यांनी केला.
