राज्य शिष्यवृत्ती परीक्षेत फलटण नगरपालिका शाळा क्रमांक ८ चा शंभर टक्के निकाल; विद्यार्थ्यांचा दणदणीत डंका !

इयत्ता चौथीतील शरण्या घोरपडे व अर्णव थोरात शिष्यवृत्तीस पात्र; पालिका शाळेच्या गुणवत्तेवर कौतुकाचा वर्षाव.

। लोकजागर वृत्त । फलटण । ११ ऑगस्ट २०२६ ।

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता चौथी व सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत फलटण नगरपालिका शाळा क्रमांक ८ च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवत गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. या परीक्षेमध्ये शाळेचा निकाल तब्बल १०० टक्के लागला असून पालिका शाळेने आपल्या उत्कृष्ट शैक्षणिक गुणवत्तेच्या जोरावर शहरात आपला मोठा डंका वाजवला आहे.

इयत्ता चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यालयातील शरण्या घोरपडे हिने २३८ गुण आणि अर्णव थोरात याने २३६ गुण मिळवत राज्यस्तरीय शिष्यवृत्तीस पात्र ठरण्याचा बहुमान मिळवला आहे. या परीक्षेस बसलेल्या सर्व ६ विद्यार्थ्यांनी उत्तम गुण मिळवत यश संपादन केले. यामध्ये माही क्षीरसागर (२३० गुण), अनमोल निकम (२२४ गुण), अर्शिया तांबोळी (२०० गुण) आणि अमेय गायकवाड (१५६ गुण) या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. तसेच इयत्ता सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यालयातील देवेंद्र पावणे याने १८० गुण मिळवत उज्ज्वल यश संपादन केले आहे. नगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या उल्लेखनीय यशामुळे पालिका शाळेचा दर्जा पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे.

या यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे मुख्याध्यापक दीपक पवार, शिक्षक वनिता निंबाळकर, योगेश गोडसे, वर्षा दांगट आणि अमोल खंकाळ यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. नगरपालिका शाळेच्या या दैदिप्यमान यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, उपनगराध्यक्षा प्रियदर्शनी भोसले, मुख्याधिकारी निखिल जाधव, प्रशासन अधिकारी अनिल संकपाळ, वरिष्ठ लिपीक नितीन खाडे यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, सदस्य आणि पालकांनी विशेष अभिनंदन केले आहे.

Spread the love