फलटण तालुक्यातील गरजू कुटुंबांसाठी ८९०० घरकुले मंजूर : माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर

तांत्रिक अडचणींमुळे अपात्र ठरलेल्या १३०० अर्जांची होणार पुन्हा छाननी; आमदार सचिन पाटील यांचे नागरिकांना आवाहन.

। लोकजागर वृत्त । फलटण । ११ ऑगस्ट २०२६ ।

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून फलटण तालुक्यातील गरजू व गरीब कुटुंबातील नागरिकांना एकूण ८९०० घरकुल मंजूर करण्यात आली आहेत. तसेच १३०० घरकुल अर्ज तांत्रिक अडचणींमुळे अपात्र ठरले असून त्यांची पुन्हा छाननी करून पात्र ठरणाऱ्या अर्जदारांना घरकुल मंजूर करण्यात येणार असल्याचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी या वेळी स्पष्ट केले आहे.

या वेळी बोलताना रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले की, तालुक्यातील गोर-गरीब व गरजू नागरिकांना घरकुल देत असताना आपणास आनंद होत आहे. अनेक नागरिक चांगल्या घरापासून वंचित असतात. गरिबी व आर्थिक परिस्थितीमुळे घर बांधणे शक्य होत नाही. अशा नागरिकांना घरे देण्याचा आनंद हा शब्दात व्यक्त करता येत नाही. युती सरकारच्या माध्यमातून ही योजना राबवण्यात आली असून तालुक्यातील जे जे नागरिक या योजनेस पात्र असतील त्यांना सर्वांना घरकुल देण्याचा आपला निर्धार आहे.

तांत्रिक दृष्ट्या अपात्र ठरलेल्या अर्जांची छाननी लवकरच सुरू करण्याबाबत संबंधित अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या आहेत, त्यामुळे अपात्र ठरलेल्या नागरिकांनी मनात कोणतीही शंका बाळगू नये, असे आवाहन आमदार सचिन पाटील यांनी या वेळी केले.

Spread the love