पांचगणी येथे रंगला ‘पणती’ काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा.
। लोकजागर वृत्त । पांचगणी । ४ सप्टेंबर २०२६ ।
कुसुम शिंदे यांनी लिहिलेला ‘पणती’ हा काव्यसंग्रह भावनेच्या कल्लोळातून जन्माला आला असून, त्यांच्या प्रत्येक कवितेत ओतप्रोत भावना पाहावयास मिळते. कर्ता मुलगा ऐन तारुण्यात गेल्यामुळे मानसिक धक्क्यातून सावरण्यासाठी त्या कवितेकडे वळल्या आणि सहजगत्या अप्रतिम काव्यनिर्मिती झाली, असे उद्गार ‘पणती’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करताना धर्मवीर संभाजी महाराज साहित्य संमेलनाचे आयोजक प्रकाश सस्ते यांनी काढले. काव्य विशिष्ट कारणाने जन्माला येते आणि ते सकस होते, हे ‘पणती’ काव्यसंग्रहात दिसून येते असे ते पुढे म्हणाले.
या प्रसंगी प्रकाश बेलोशे, लक्ष्मण हिरवे, मुरलीधर धायगुडे, जाधवराव, सुनील धनावडे, स्वाती जगदाळे, प्रतिभा बेलोशे, जगन्नाथ शिंदे व अनेक मान्यवर उपस्थित होते. कुसुम शिंदे यांनी मनोगत व्यक्त करताना नियतीने क्रूर डाव साधला आणि तिनेच शब्द दिले, सावरण्याचे बळ दिले, त्यातून हा काव्यसंग्रह जन्माला आल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार मुकुंद शिंदे यांनी मानले.
