किंगमेकर कुणी म्हणवून घेऊ नये, जनतेची दिशाभूल थांबवा; अनुप शहा यांचा संजीवराजेंना सडेतोड इशारा

१२ वरून ८ वर येणारे किंगमेकर कसे? रणजितदादांच्या धाकानेच अनेकांनी मैदान सोडले – अनुप शहा यांचा प्रहार

। लोकजागर । फलटण । दि. ११ फेब्रुवारी २०२६ ।

“मागच्या पंचायत समिती निवडणुकीत आमच्या केवळ २ जागा होत्या, आज आम्ही ८ झालो आहोत; मात्र तुम्ही १२ वरून ८ वर आला आहात. तरीही स्वतःला ‘किंगमेकर’ म्हणवून घेणे ही केवळ हास्यास्पद बाब आहे. पराभवाच्या धाकाने ज्यांनी निवडणूक लढवली नाही, त्यांनी किंगमेकरच्या गप्पा मारून जनतेची दिशाभूल करू नये,” अशा आक्रमक शब्दांत फलटण पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते अनुप शहा यांनी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या विधानाचा समाचार घेतला.

जिल्हा परिषद – पंचायत समिती निवडणूक निकालानंतर शिवसेनेच्यावतीने सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनाच किंगमेकर असल्याचे स्पष्ट केले होते. त्यांच्या या विधानाला प्रतिउत्तरादाखल अनुप शहा बोलत होते. “तुमच्या घरात आज एकही जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती सदस्य नाही. ही लोकशाही केवळ रणजितदादांच्या भीतीपोटीच अस्तित्वात आली आहे,” असा टोला शहा यांनी लगावला.

युवा संधीच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह राजे गटाकडून तरुणांना संधी दिल्याचा दावा केला जात असल्यावरही शहा यांनी निशाणा साधला. “जर तुम्ही युवकांना संधी दिली म्हणता, मग विश्वजितराजे यांना का संधी दिली नाही? नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक म्हणून अनिकेतराजे यांना संधी देताना इतर सामान्य युवा कार्यकर्त्यांचा विचार का झाला नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, अनिकेतराजे यांनी प्रांतांच्या चौकशीची मागणी करायची आणि दुसरीकडे संजीवराजेंनी त्याच अधिकाऱ्यांच्या कामाचे कौतुक करायचे, ही विसंगती कशाचे प्रतीक आहे? तुम्हाला १९९५ ची पुनरावृत्ती २०२९ मध्ये होईल अशी भीती वाटतेय का? असा प्रश्नही त्यांनी विचारला.

विकासाच्या मुद्द्यावर रणजितदादांची पाठराखण रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली फलटणमध्ये झालेली कामे हीच खरी विकासाची ओळख असल्याचे शहा यांनी नमूद केले. “आमचा नेता विकासासाठी काम करणारा आहे. रणजितदादा, आमदार सचिन पाटील आणि जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नातून फलटणला अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर झाले आहे. भविष्यातील संभाव्य ११ जिल्ह्यांच्या यादीत फलटणचा समावेश झाला असून, तालुका जिल्ह्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. साखरवाडी तहसील कार्यालयामुळे पश्चिम भागातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे,” असे त्यांनी आवर्जून सांगितले.

सभापती भाजप-राष्ट्रवादीचाच होणार! पंचायत समितीच्या ८-८ अशा समान ‘टाय’वर बोलताना अनुप शहा यांनी विश्वास व्यक्त केला की, उद्या होणाऱ्या पंचायत समिती सभापती निवडीत भाजप-राष्ट्रवादी महायुतीचाच सभापती विराजमान होईल. “आमचा दैवी शक्तीवर पूर्ण विश्वास आहे आणि नशिबाची साथ फलटणच्या विकासासाठी महायुतीलाच मिळेल,” असा दावा त्यांनी यावेळी केला.

Spread the love