जेष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ आणि मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन; विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासावर दिला भर
। लोकजागर । फलटण । दि. २१ फेब्रुवारी २०२६ ।
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रेरित ‘सेवाभारती’ संचालित संगणक प्रयोगशाळा उपक्रमाचा शुभारंभ फलटण येथील वेदांत अकादमी ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या अभिनव उपक्रमांतर्गत बी.कॉम. मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अत्यंत नाममात्र दरात ‘टॅली’ (Tally) हा व्यावसायिक कोर्स उपलब्ध करून दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि त्यांना तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी हा उपक्रम मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाची सुरुवात परंपरेनुसार सरस्वती पूजनाने झाली. त्यानंतर संस्थेचे संस्थापक श्री. स्वानंद जोशी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. प्रास्ताविक करताना स्वानंद जोशी यांनी ‘टॅली’ कोर्सचे व्यावसायिक महत्त्व विशद केले आणि अकादमीतर्फे दिल्या जाणाऱ्या अद्ययावत सुविधांची माहिती दिली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले जेष्ठ पत्रकार श्री. रवींद्र बेडकिहाळ यांनी वेदांत अकादमीच्या शैक्षणिक कार्याबद्दल समाधान व्यक्त केले. सेवाभारतीच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांसाठी राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले आणि हा ज्ञानयज्ञ असाच सातत्याने सुरू राहावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
सेवाभारती पश्चिम महाराष्ट्र सहसचिव श्री. प्रवीण देशपांडे यांनी आपल्या मनोगतात सेवाभारती तर्फे चालवल्या जाणाऱ्या विविध सेवाकार्यांचा आढावा घेतला. संगणक साक्षरतेमुळे विद्यार्थ्यांच्या करिअरला नवी दिशा मिळेल, अशी खात्री त्यांनी व्यक्त केली. यावेळी सेवाभारती स्वावलंबन विभागाच्या प्रांत समिती सदस्या व दहिवडी येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. पद्मा कुबेर यांनीही उपस्थित राहून संस्थेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना हा महत्त्वपूर्ण कोर्स सुरू केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. योगेश ढेकळे यांनी केले, तर आभार श्री. स्वानंद जोशी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सेवाभारतीच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
