धुळदेव विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा संपन्न
। लोकजागर । फलटण । दि. २१ फेब्रुवारी २०२६ ।
“सकारात्मकता हा यशस्वी जीवनाचा खरा पाया असून विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या दडपणाखाली न राहता शांतचित्ताने सामोरे जावे. आरोग्य हीच खरी संपत्ती आहे आणि या धनाचा सांभाळ प्रत्येकाने प्रयत्नपूर्वक केला पाहिजे. आयुष्यात अनेक परीक्षा येतात आणि जातात, मात्र त्यांना धीराने पार पाडणे महत्त्वाचे आहे,” असे मौलिक विचार प्रसिद्ध वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. प्रसाद जोशी यांनी मांडले. धुळदेव येथील श्रीमान शेठ धन्यकुमार रतनचंद गांधी विद्यालयात आयोजित दहावीच्या विद्यार्थ्यांच्या ‘शुभचिंतन समारंभ’ प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्या सौ. प्रतिभाताई शिंदे होत्या. त्यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देत जीवनात ध्येयवादी राहण्याचे आवाहन केले. सकाळच्या सत्रात मार्गदर्शन झाल्यानंतर सायंकाळच्या सत्रात विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले. यामध्ये तब्बल २७ विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश होता, ज्याला पालकांनी उत्स्फूर्त दाद दिली. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक मोरे सर यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देण्यात आले, ज्यामुळे निरोपाचा हा क्षण अधिक स्मरणीय ठरला.
या सोहळ्याला धुळदेवच्या सरपंच पुजाताई भिवरकर, हरिभाऊ माने, चंद्रकांत जाधव, व्यंकटराव दडस, दत्तात्रय भिवरकर सर, ॲड. सचिन महामुनी, अभिमन्यू ढोपरे, सुभाष शिंदे यांसह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक मोरे सर यांनी केले, तर सूत्रसंचालन एस. बी. अभंग व ए. पी. गावडे यांनी केले. शेवटी यादव सर यांनी उपस्थितांचे आभार मानले. विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांच्या मोठ्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहात पार पडला.
