मातृभाषेचा अभिमान बाळगून तिचा जास्तीत जास्त वापर करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी

फलटणच्या ‘साहित्यिक संवाद’ मध्ये सूर

। लोकजागर । फलटण । दि. २ मार्च २०२६ ।

“मराठी भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून ती महाराष्ट्राची अस्मिता आहे. मराठीवर कितीही परकीय भाषांची आक्रमणे झाली, तरी तिचे अस्तित्व कोणीही पुसू शकणार नाही. स्थानिक बोलीभाषा विकसित झाल्याशिवाय प्रमाण मराठीचा विकास पूर्ण होणार नाही, त्यामुळे आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगून दैनंदिन व्यवहारात तिचा जास्तीत जास्त वापर करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे,” असा सूर फलटण येथील नाना-नानी पार्क येथे आयोजित ‘मराठी भाषा गौरव दिन’ आणि ‘३६ व्या साहित्यिक संवादात’ उमटला.

साहित्यप्रेमी सेवाभावी फाउंडेशन आणि वन विभाग, फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज अधोरेखित करण्यात आली. “मराठी साहित्य जर जागतिक भाषांमध्ये अनुवादित झाले, तर आपल्या भाषेचा दर्जा आणि सन्मान जगभर वाढेल,” असे मत यावेळी व्यक्त झाले. फलटणचा हा ‘साहित्यिक संवाद’ गेली तीन वर्षे अविरतपणे सुरू असून, तो लेखणीला आणि विचारांना बळ देण्याचे कार्य करत आहे, ही शहरासाठी अभिमानाची बाब असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे मुख्य संयोजक आणि माणदेशी साहित्यिक ताराचंद्र आवळे यांनी प्रास्ताविकातून मराठी भाषेची सद्यस्थिती आणि साहित्य संमेलनांमधील घडामोडींवर प्रकाश टाकला. यावेळी विविध क्षेत्रांतील साहित्यप्रेमींचा ‘फलटण तालुका साहित्य प्रेमी सन्मानपत्र’ आणि पुस्तक देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये प्राचार्य रवींद्र येवले, विक्रम आपटे, सुरेश भगत, विनायक ननावरे, सुधीर इंगळे, आशा दळवी, विजया सुरवसे, राजाभाऊ काकडे, संगीता वाघमारे यांच्यासह अनेक मान्यवरांचा समावेश होता.

याप्रसंगी रोहिणी भंडलकर, करिश्मा मुलाने, सुधीर इंगळे व इतर मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त करत मराठी भाषेच्या वृद्धीसाठी सजग राहण्याचा निर्धार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ताराचंद्र आवळे यांनी केले, तर श्रेयस कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. हा सोहळा साहित्यप्रेमींच्या उदंड प्रतिसादामुळे अत्यंत प्रेरणादायी ठरला.

Spread the love