जोपर्यंत जिल्हा परिषद शाळा आणि लालपरी टिकून आहे, तोपर्यंत मायमराठीचा डंका वाजतच राहणार : प्रा. रवींद्र कोकरे

। लोकजागर । बारामती (पणदरे) । दि. २ मार्च २०२६ ।

“मराठी ही केवळ भाषा नसून ती शूर, वीर, वारकरी आणि कष्टकऱ्यांची मातृभाषा आहे. विवेकसिंधू, ज्ञानेश्वरीपासून ते तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेपर्यंतच्या महान ग्रंथांनी मराठीचे वैभव विश्वभर पोहोचवले आहे. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा आणि खेड्यापाड्यात पोहोचणारी ‘लालपरी’ (एसटी) जोपर्यंत अबाधित आहे, तोपर्यंत मायमराठीचा डंका चहूमुलखात घुमतच राहील,” असे ठाम प्रतिपादन ग्रामीण कथाकार प्रा. रवींद्र कोकरे यांनी केले.

मराठी राजभाषा गौरव दिनाचे औचित्य साधून ‘साहित्य विचार मंच, सांगवी’ आणि ‘सुनेत्राजित साहित्य, कला, क्रीडा, सांस्कृतिक प्रतिष्ठान, अहिल्यानगर (पणदरे)’ यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सतीश तावरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सोहळ्यात परिसरातील साहित्यिक युवराज खलाटे, प्रा. राजेंद्र आगवणे, नूतन तावरे आणि ताराचंद आगवणे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी मान्यवरांच्या हस्ते वृक्षरोपणही करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष सतीश तावरे यांनी नव्या पिढीला मायबोलीचा वसा आणि वारसा देण्याचे आवाहन केले. याप्रसंगी नानासो तावरे, संतोष शहा, महेश तावरे, अजित तावरे, दिनकर काळे, सेवा गडकरी यांसह पंचक्रोशीतील अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवीण सूर्यवंशी यांनी केले, सूत्रसंचालन अंकुश शिंदे यांनी तर आभार प्रदर्शन अतुल तावरे यांनी केले. मराठी भाषा आणि निसर्ग संवर्धनाचा संदेश देणारा हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.

Spread the love