केंद्र सरकारचा ‘अत्यावश्यक वस्तू कायदा’ लागू; ९ मार्चपासून पुरवठा थांबल्याने व्यावसायिकांची पाचावर धारण
। लोकजागर । फलटण । गुरुवार, दि. १२ मार्च २०२६ ।
आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा मोठा फटका आता फलटणच्या स्थानिक बाजारपेठेला बसू लागला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर गॅस पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे केंद्र सरकारने ‘अत्यावश्यक वस्तू कायदा’ लागू केला असून, परिणामी ९ मार्चपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे फलटणमधील हॉटेल, बेकरी, मेस आणि केटर्स व्यावसायिकांसमोर मोठे संकट उभे राहिले असून, पुढील सूचना येईपर्यंत हीच स्थिती कायम राहणार असल्याने शहरातील खाद्य उद्योगांना यांचा मोठा फटका बसणार असल्याची भीती व्यक्त होत आहे.
९ मार्चपासून गॅस पुरवठा थांबल्याने फलटणमधील अनेक छोट्या व्यावसायिकांकडे असलेला सिलिंडरचा साठा आता संपत आला आहे. नवीन सिलिंडर उपलब्ध होत नसल्याने अनेक हॉटेल मालक आणि खाऊ गल्लीतील स्टॉलधारक हतबल झाले आहेत. “व्यावसायिक गॅस उपलब्ध नसल्याने दुकाने कशी चालवायची आणि कामगारांचे पगार कसे करायचे?” असा सवाल फलटणमधील उद्योजकांकडून विचारला जात आहे. मार्चअखेरची वसुली आणि बँकांचे हप्ते भरायचे असतानाच हा गॅस पुरवठा खंडित झाल्याने व्यावसायिकांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे.
केवळ हॉटेलच नव्हे, तर लग्नसराईच्या हंगामात केटर्स व्यावसायिकांनाही याचा मोठा फटका बसणार आहे. गॅसअभावी अनेक मोठे समारंभ आणि घरगुती मेस अडचणीत आल्या आहेत. प्रशासनाकडून पुढील आदेश येईपर्यंत हीच परिस्थिती राहणार असल्याने, फलटणमधील हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या या उद्योगांची चाके आता थांबण्याची शक्यता आहे. या गंभीर परिस्थितीत स्थानिक प्रशासन काही पर्यायी व्यवस्था करणार का, याकडे फलटणमधील सर्व व्यावसायिकांचे लक्ष लागून राहिले आहे.
