| लोकजागर | विशेष लेख |
वैष्णवांसाठी या पवित्र दिवसाचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी भक्त पायी वारी करत पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी जातात. वारकरी हे व्रत खूप निष्ठेने आचरत असतात. विठ्ठलाचे नाव हे तारक स्वरूपाचे आहे. त्याच्या हातात कुठलेही शस्त्र नाही. तो कुठल्याही जिवाचा संहार करत नाही. हे त्याचे आगळे वेगळे वैशिष्ट्य आहे. एकादशीपासून चातुर्मासाला आरंभ होतो. भगवान श्री विष्णू क्षीरसागरात शेषशय्येवर चार महिने निद्राधीन होतात. म्हणून या दिवसाला ‘देवशयनी एकादशी’ म्हणतात. एकादशी दिवशी सकाळी लवकर उठून सुचिर्भूत होऊन आपल्या कुलदेवतेची व विष्णूची पूजा करावी. विष्णुसहस्रनाम, रामरक्षा ,गीतेचा पंधरावा अध्याय पठण करावा. आणि उपवासही करावा. उपवास म्हणजे मनाने परमेश्वराच्या सानिध्यात राहणे. भगवान श्री विष्णूला १००० किंवा १०८ तुळशी पत्रं वहावीत उपवासाचा मूळ हेतू हा आहे की! पुण्य प्राप्ती बरोबर शारीरिक इंद्रियांना ही विश्रांती मिळावी. वारकरी संप्रदाय वैष्णव संप्रदायातील एक प्रमुख संप्रदाय आहे. या संप्रदायात वारी केली जाते. ही वारी पायी केल्याने शारीरिक तप तर घडतेच आणि उपवास केल्यामुळे पुण्यप्राप्ती बरोबर शरीरातील इंद्रियांनाही विश्रांती मिळते. वारकरी ऊन पावसाची तमा न बाळगता विठ्ठल नामाचा मनोभावे गजर करत नामात तल्लीन होऊन पायी वारी करत असतात.
