महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्यासाठी पुत्वाकार; नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन.
। लोकजागर । फलटण । ७ मे २०२६ ।
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभागाच्या १८ फेब्रुवारी २०२६ च्या निर्णयानुसार, “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान (टप्पा १)” ची अंमलबजावणी फलटण शहरात केली जात आहे. महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी आणि सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिलांच्या दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी हे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. हे विशेष शिबीर ८ मे २०२६ रोजी फलटण येथील बी.एस.एन.एल. ऑफिस शेजारील नगरपरिषद सभागृहात पार पडणार आहे.
या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना एकाच छताखाली अनेक महत्त्वपूर्ण सेवा पुरविण्यात येणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने जिवंत ७/१२ मोहीम राबवून वारस नोंद, लक्ष्मी मुक्ती व इतर नोंदी करून ७/१२ व ८अ उताऱ्यांचे वाटप केले जाईल. तसेच, लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी, जातीचे प्रमाणपत्र आणि नॉन-क्रिमीलेअर यांसारख्या दाखल्यांचे अर्ज स्वीकारून त्यांचे तात्काळ वितरण केले जाणार आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी देखील विशेष दाखले शिबीर आयोजित करून त्यांना विविध दाखल्यांचे वाटप करण्यात येईल. याशिवाय सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे लाभ मंजूर करणे, प्रलंबित फेरफार निकाली काढणे आणि पी.एम. किसान योजनेचे ई-केवायसी व आधार सीडिंगचे कामकाजही येथे पूर्ण केले जाईल.
शेतकऱ्यांसाठी ई-मोजणी, प्रॉपर्टी कार्ड वाटप आणि नवीन अकृषक (NA) तरतुदींबाबत मार्गदर्शनाची सोयही या शिबिरात उपलब्ध असेल. महसूल विभागाव्यतिरिक्त अन्य शासकीय कार्यालयांचे कामकाजही या शिबिराच्या माध्यमातून मार्गी लावले जाणार आहे. तरी फलटण शहरातील सर्व नागरिकांनी, लोकप्रतिनिधींनी, महिला बचत गटांनी आणि पत्रकार बंधूंनी या ‘महाराजस्व समाधान शिबिरात’ सहभागी होऊन सर्व शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
