‘देश प्रथम’! पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत शंभूराज देसाईंचा युरोप दौरा रद्द

कौटुंबिक सहलीपेक्षा राष्ट्रहिताला प्राधान्य; विदेशी चलन बचतीसाठी पर्यटनमंत्र्यांचा स्तुत्य निर्णय.

। लोकजागर । मुंबई/सातारा । १३ मे २०२६ ।

देशातील सद्यस्थिती आणि आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा विचार करता, विदेशी चलनाची बचत करण्यासाठी अनावश्यक परदेश दौरे व खर्च टाळण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. पंतप्रधानांच्या या राष्ट्रहितैषी आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत महाराष्ट्राचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आपला नियोजित युरोप दौरा रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. वैयक्तिक आनंदापेक्षा देशहिताला प्राधान्य देणाऱ्या या निर्णयाचे राजकीय वर्तुळातून विशेष कौतुक होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंत्री शंभूराज देसाई यांनी सुमारे तीन महिन्यांपूर्वी आपल्या कुटुंबासह लंडन, पॅरिस आणि ॲम्स्टरडॅम या प्रमुख शहरांची सहल आखली होती. ही केवळ कौटुंबिक सुट्टी आणि पर्यटनासाठी नियोजित असलेली खासगी भेट होती. मात्र, देशहिताचा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा आणि सरकारी जबाबदारीचे भान राखले जावे, या उद्देशाने देसाई यांनी या सहलीवर पाणी सोडले आहे. “देश प्रथम” ही भूमिका कृतीतून मांडत त्यांनी एक आदर्श उदाहरण घालून दिले आहे.

पंतप्रधानांच्या आवाहनानंतर तात्काळ असा धाडसी निर्णय घेणारे शंभूराज देसाई हे राज्यातील महत्त्वाचे मंत्री ठरले आहेत. जबाबदारीची जाणीव आणि साधेपणाचा संदेश देणाऱ्या या निर्णयामुळे देसाई यांच्याबद्दल आदराची भावना व्यक्त होत आहे. राष्ट्रहित जपण्यासाठी मंत्र्यांनी दाखवलेली ही तत्परता सध्या साताऱ्यासह संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरली असून, त्यांच्या या कृतीमुळे प्रशासकीय आणि राजकीय स्तरावर एक सकारात्मक संदेश गेला आहे.

Spread the love