फलटणच्या औद्योगिक विकासासाठी लवकरच ‘अतिरिक्त एमआयडीसी’ची उभारणी; उद्योगमंत्री उदय सामंत यांची मोठी घोषणा

“एकनाथ शिंदेंचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची भगवी रेष”; माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या जागतिक दर्जाच्या कंपनीचे केले जाहीर कौतुक.

। लोकजागर । फलटण । २८ मे २०२६ ।

“फलटण तालुक्याच्या औद्योगिक विकासाला अधिक गतिमान करण्यासाठी आगामी काही दिवसांत फलटणमध्ये ‘अतिरिक्त एमआयडीसी’ (MIDC) उभारण्यात येणार आहे. विधान परिषदेचे आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी यासंदर्भात आग्रही मागणी केली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही अतिरिक्त एमआयडीसी सुरू करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची भगवी रेष आहे, त्यामुळे ही एमआयडीसी मंजूर करून आणण्यात आम्हाला १०० टक्के यश येणार आहे,” असा ठाम विश्वास राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री ना. डॉ. उदय सामंत यांनी व्यक्त केला.

कोळकी (फलटण) येथील अनंत मंगल कार्यालयात शिवसेना फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आयोजित ‘पदाधिकारी निवड आढावा बैठक, बूथ लेव्हल एजंट (BLA) नोंदणी अभियान’ आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित सदस्यांच्या भव्य सत्कार सोहळ्यात ते मुख्य वक्ते म्हणून बोलत होते.

याप्रसंगी माढा लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख चंद्रहार पाटील, खासदार प्रा. ज्योती वाघमारे, माजी खासदार राहुल शेवाळे, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, नगरसेवक अनिकेतराजे नाईक निंबाळकर, पंचायत समितीचे माजी अध्यक्ष विश्वजितराजे नाईक निंबाळकर, उपसभापती अमोल सस्ते, शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, तालुकाप्रमुख विराज खराडे, जिल्हा परिषद सदस्य सह्याद्री कदम, वैशालीताई कांबळे, ज्योती मोरे, तसेच अविनाश कुलकर्णी, रेश्माताई भोसले आणि बाळासाहेब मुलाणी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

जगाला पोटॅशियम देणारा पश्चिम महाराष्ट्र तयार झाला: पुढे बोलताना मंत्री उदय सामंत म्हणाले की, फलटणमध्ये सध्या जगातील तीन नंबरची पोटॅशियम बनवणारी कंपनी संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी उभी केली आहे. आजवर साखर कारखानदारांचा पश्चिम महाराष्ट्र म्हणून ओळख होती, परंतु आता जगाला पोटॅशियम देणारा पश्चिम महाराष्ट्र तुमच्या रूपाने तयार झाला ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. या जागतिक दर्जाच्या कंपनीला राज्य सरकारकडून संपूर्ण सहकार्य केले जाईल, तसेच राज्यात इतर कोणत्याही एमआयडीसीमध्ये या कंपनीला विस्तारासाठी जागा लागल्यास ती प्राधान्याने उपलब्ध करून दिली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. तसेच, एमआयडीसीसाठी शेतकऱ्यांवर जबरदस्ती करून कुठलीही जमीन संपादित केली जाणार नाही; तर शेतकऱ्यांना जे पाहिजे ते देऊन, त्यांना विश्वासात घेऊनच जमीन संपादित केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सक्षमपणे काम करेल तोच पक्षाचा पदाधिकारी असेल; उदय सामंत यांचा इशारा: संघटनेवर बोलताना मंत्री सामंत यांनी पदाधिकाऱ्यांना कडक शब्दात सुनावले. “शिवसेना हा गटबाजीला थारा देणारा पक्ष नसून सामान्य कार्यकर्त्यांना बळ देणारा पक्ष आहे. शिवसेना जिल्हाध्यक्षांनी आमदार किंवा मंत्र्यांच्या गाडीचे दरवाजे उघडण्याचे काम करू नये. धर्मवीर आनंद दिघे आणि स्वतः ठाणे जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष राहिलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाध्यक्षांचा काय दरारा असतो हे दाखवून दिले आहे. त्यामुळे यापुढे जो सक्षमपणे जमिनीवर काम करेल, तोच पक्षाचा पदाधिकारी असेल,” असा थेट इशारा त्यांनी दिला. तसेच माढा लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख चंद्रहार पाटील यांनी १३६ मतदारसंघांच्या दौऱ्यात १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करून राज्यात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांनी चंद्रहार पाटील यांचे तोंडभरून कौतुक केले.

संजीवराजेंना आमदार करण्याची कार्यकर्त्यांची मागणी: “पूर्वी तालुक्यात शिवसेना कार्यरत होतीच, मात्र रामराजे आणि संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील ‘राजे गटाने’ शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर फलटण विधानसभा मतदारसंघात पक्षाची ताकद प्रचंड वाढली आहे. आगामी काळात फलटणचा आमदार शिवसेनेचाच असेल,” असा विश्वास मंत्र्यांनी व्यक्त केला. याच वेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी “संजीवराजे नाईक निंबाळकर यांना आमदार करा,” अशी जोरदार घोषणाबाजी केली. त्यावर उत्तर देताना मंत्री सामंत म्हणाले की, संजीवराजेंना पक्षात मोठी जबाबदारी व चांगले स्थान मिळाले तर आम्हांला आनंदच होईल; कार्यकर्त्यांच्या या लोकभावना आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत निश्चित पोहोचवू.

येत्या ८ ते १० दिवसांत नवीन पदाधिकारी निवडी: माढा लोकसभा संपर्कप्रमुख चंद्रहार पाटील यांनी माहिती दिली की, माढा लोकसभा मतदारसंघात बीएलए (BLA) चे १०० टक्के काम पूर्ण झाले असून, जुन्या सर्व जुन्या पदाधिकाऱ्यांच्या कमिट्या बरखास्त केल्या आहेत. येत्या आठ-दहा दिवसांत प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जाऊन नवीन सक्षम पदाधिकाऱ्यांची निवड केली जाईल. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि फलटण नगर परिषद निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

घरोघरी पोहोचून शिवसेनेची ताकद वाढवा: संजीवराजे नाईक निंबाळकर कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी मतदार पुनरीक्षण मोहिमेचे महत्त्व अधोरेखित केले. “मतदार पुनरीक्षणाचे काम अत्यंत महत्त्वाचे असून ते आपल्याला गांभीर्याने व योग्य रित्या पार पाडावे लागणार आहे. आपल्या विचारांचे मतदार यादीतून वगळले जाणार नाहीत याची काळजी घ्या. या मोहिमेच्या माध्यमातून लोकांच्या घरोघरी पोहोचून शिवसेनेची ताकद वाढवा. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा विचार सातारा व सोलापूर जिल्ह्यात रुजवण्यासाठी ताकदीने कामाला लागा, एकनाथ शिंदे आपल्या पाठीशी ठाम उभे आहेत,” असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमादरम्यान तालुकाप्रमुख विराज खराडे यांनी फलटण तालुक्यातील ‘बीएलए’ (BLA) कामाचा सविस्तर आढावा मांडला.

Spread the love