मान्सूनच्या प्रतीक्षेमुळे नागरिकांची धाकधूक वाढली; हवामान विभागाकडून ११ जूनपर्यंत राज्यात अल्प पावसाचा अंदाज

आज देशातील १५ राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अलर्ट; उत्तर व मध्य भारतात तापमानात घट होण्याची शक्यता.

। लोकजागर । फलटण / मुंबई । २९ मे २०२६ ।

केरळमधील मान्सून आगमनाच्या निश्चित तारखेचा नवा सुधारित अंदाज भारतीय हवामान विभागाकडून (IMD) अद्याप जाहीर करण्यात आलेला नसल्याने, नागरिकांची पावसाची प्रतीक्षा अधिकच लांबत चालली आहे. गुरुवारी हवामान विभागाने जाहीर केलेल्या पुढील दोन आठवड्यांच्या दीर्घकालीन पूर्वानुमानानुसार, महाराष्ट्रात येत्या ११ जूनपर्यंत किनारपट्टी भाग आणि राज्याच्या अंतर्भागात सरासरीपेक्षा कमी (अल्प) पाऊस पडण्याची शक्यता आहे. केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर देशातील बहुतांश भागातही या काळात फारसा पाऊस नसेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. मुंबईत मान्सून दाखल होण्याची अधिकृत सरासरी तारीख ११ जून आहे, मात्र यंदाच्या कोरड्या स्थितीमुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांची चिंता वाढली आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रातील किनारपट्टीवर तसेच उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी आगामी ४ जूनपर्यंत प्रतिदिन १० मिलीमीटरपर्यंत हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकेल. त्यानंतरच्या आठवड्यात, म्हणजेच ४ ते ११ जून या कालावधीत किनारपट्टीवर पावसाचा जोर थोडा वाढण्याची शक्यता आहे. या काळात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी, तर विदर्भातही पावसाची व्याप्ती वाढू शकेल. तसेच, ३१ मे ते ३ जूनदरम्यान कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह विजा कडाडण्याचा अंदाज आहे. त्यानंतरच्या आठवड्यात मान्सूनचे वारे दक्षिण भारताच्या काही भागात वेगाने पुढे सरकण्याची शक्यता असून, ४ ते ११ जून दरम्यान कोकण आणि गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

देशातील १५ राज्यांमध्ये आज ‘अलर्ट’; वादळी वाऱ्यासह पाऊस:
दुसरीकडे, हवामान विभागाने आज, शुक्रवार दिनांक २९ मे २०२६ रोजी देशातील १५ राज्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा आणि वादळाचा ‘अलर्ट’ जारी केला आहे. उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार, राजस्थान, हरियाणा, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरसह १५ राज्यांमध्ये ताशी ९० किलोमीटर वेगाने सोसाट्याचा वादळी वारा वाहण्याची आणि मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. या वादळी पावसामुळे उत्तर, मध्य आणि पूर्व भारतातील काही भागांमध्ये तापमानाचा पारा लक्षणीयरीत्या घसरणार असल्याने कडक उन्हाळ्यापासून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

येत्या २ ते ३ दिवसांत ईशान्य आणि पूर्व भारतातील काही भागांतही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वायव्य भारत, राजस्थान, विदर्भ आणि पूर्व मध्य प्रदेशात काही ठिकाणी चालू आठवड्याच्या अखेरीस तापमानात मोठी घट होण्याची शक्यता असल्याने हवामानातील हा बदल नागरिकांसाठी सुखावह ठरणार आहे. मात्र, महाराष्ट्रात मुख्य मान्सूनचा जोर वाढण्यासाठी जूनच्या दुसऱ्या आठवड्याची वाट पहावी लागणार असल्याचे चिन्हे स्पष्ट आहेत.

Spread the love