पालखी मार्गावरील रस्ते व आरोग्य सुविधांची कामे ३० जूनपर्यंत पूर्ण करा; विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांचे आदेश

लोणंद ते बरड दरम्यान पालखी तळांची व मार्गाची पाहणी; प्रशासकीय यंत्रणेला २४ तास सतर्क राहण्याच्या सूचना.

। लोकजागर । फलटण । ५ जून २०२६ ।

आगामी श्री संत ज्ञानेश्वर महाराज आषाढीवारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर, पुणे विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी आज लोणंद ते फलटण दरम्यानच्या पालखी मार्गाची आणि विविध तळांची प्रत्यक्ष भेट देऊन सविस्तर पाहणी केली. श्री संत ज्ञानेश्वर पादुका निरास्नान स्थळ, चांदोबाचे लिंब, तरडगाव पालखीतळ, राव रामोशी पूल, फलटण पालखी मार्ग आणि बरड पालखी तळ या ठिकाणी त्यांनी भेट दिली. वारकऱ्यांना सोहळ्यादरम्यान कोणताही त्रास होऊ नये, यासाठी प्रशासकीय पातळीवर जय्यत तयारी करून सर्व आवश्यक सोयी-सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्याच्या कडक सूचना त्यांनी यावेळी संबंधित यंत्रणेला दिल्या.

या पाहणी दौऱ्यादरम्यान विभागीय आयुक्तांनी लोणंद, तरडगाव ते फलटण आणि बरड या मुख्य पालखी मार्गावरील रस्त्यांची अपुरी कामे तात्काळ मार्गी लावण्याचे निर्देश दिले. पालखी मार्गावर आणि विसाव्याच्या ठिकाणी असलेली तात्पुरती बांधकामे व अतिक्रमणे स्थानिक प्रशासनाने त्वरित हटवावीत, असे त्यांनी बजावले. लोणंद व फलटण येथील पालखी तळांची स्वच्छता, सपाटीकरण, पावसाळ्यात चिखल होऊ नये म्हणून मुरूम टाकणे आणि पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य व्यवस्था करण्यावर त्यांनी भर दिला. तसेच, वारी काळात वारकऱ्यांना मूलभूत आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी फिरते दवाखाने, पुरेशा रुग्णवाहिका आणि औषधसाठा सज्ज ठेवण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी चोवीस तास वीज राहील याची दक्षता महावितरणने घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

स्वच्छता आणि पाणीपुरवठ्याला प्राधान्य: पालखीच्या संपूर्ण मार्गावर आणि मुक्कामाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तात्पुरती व फिरती शौचालये उपलब्ध करून, त्यांच्या स्वच्छतेसाठी २४ तास पथके तैनात ठेवण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी दिल्या. वारकऱ्यांना टँकर्सद्वारे शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी नगरपालिका आणि जिल्हा परिषदेने नियोजन करावे. पाण्याचे उपलब्ध स्रोत पिण्यालायक असल्याची खात्री करूनच पुरवठा करावा, असे त्यांनी सांगितले. तसेच, रस्त्याच्या रुंदीकरणावेळी काढण्यात आलेल्या झाडांचे पालखी मार्गावर पुनर्रोपण करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. पालखी सोहळ्यादरम्यान होणारी गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सातारा पोलीस दलाने काटेकोर नियोजन करावे, असे निर्देशही त्यांनी दिले.

राव रामोशी पुलाच्या कामात अडथळा आणणाऱ्यांवर कारवाईचे संकेत: फलटण शहराजवळील राव रामोशी पुलाच्या कामाची पाहणी करताना विभागीय आयुक्त श्रीमती तेली-उगले यांनी हे काम येत्या ३० जूनपर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याचे आदेश दिले. या कामात कोणी जाणीवपूर्वक अडथळा निर्माण करत असल्यास, त्यांच्याविरोधात पोलिसांच्या मदतीने कठोर कायदेशीर कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी पालखी मार्गावर वारकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या सोयी-सुविधांची सविस्तर माहिती दिली.

या महत्त्वपूर्ण पाहणी दौऱ्याप्रसंगी जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक एस. एस. कदम, वाईचे प्रांताधिकारी योगेश खरमाटे, फलटणच्या प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर, खंडाळ्याचे प्रभारी तहसीलदार रविराज जाधव, फलटणचे तहसीलदार अभिजीत जाधव, मुख्याधिकारी निखिल जाधव, तसेच आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे विश्वस्त योगी निरंजननाथ, राजेंद्र उमाप, पुरुषोत्तम पाटील आणि चैतन्य लोंढे उर्फ कबीरबुवा यांच्यासह सर्व कार्यान्वयीन यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Spread the love