स्व. यशवंतराव चव्हाण व वेणूताई चव्हाण स्मारक परिसराच्या दुरावस्थेबाबत नगरसेवक पंकज पवार यांनी वेधले सभागृहाचे लक्ष

नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचे कार्यवाहीचे आदेश

। लोकजागर वृत्त । फलटण । १ जुलै २०२६ ।

फलटण नगर परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये भारताचे माजी उपपंतप्रधान व संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतरावजी चव्हाण आणि त्यांच्या सुविद्य पत्नी स्व. वेणूताई चव्हाण यांच्या स्मारकाच्या झालेल्या दुरावस्थेचा प्रश्न नगरसेवक पंकज पवार यांनी अत्यंत आक्रमकपणे सभागृहाच्या निदर्शनाला आणून दिला. या गंभीर विषयावर तातडीने सकारात्मक पाऊल उचलत नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी सभागृहाला आश्वस्त केले की, या स्मारकाचा विकास करण्यासाठी आम्ही दोन उद्योजक कंपन्यांशी पत्रव्यवहार केला आहे. या दोन कंपन्यांपैकी जी कंपनी स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी सर्वाधिक निधी खर्च करण्याची तयारी दर्शवेल, त्याला आपण हे स्मारक विकसित करण्याचे काम देणार आहोत. यासोबतच, या पवित्र स्मारक परिसराचा सद्यस्थितीला होत असलेला अनधिकृत पार्किंग सारखा गैरवापर तातडीने रोखण्यासाठी नगरपरिषदेच्या बांधकाम विभागाच्या माध्यमातून तिथे योग्य त्या उपाययोजना व आवश्यक कार्यवाही करण्याचे कडक आदेशही नगराध्यक्ष समशेरसिंह यांनी ऑन द स्पॉट दिले आहेत.

या संदर्भात सविस्तर माहिती देताना आणि ‘लोकजागर’शी विशेष संवाद साधताना नगरसेवक पंकज पवार यांनी सांगितले की, फलटण हे स्व. वेणूताई चव्हाण यांचे माहेर असून समस्त फलटण वासियांना या ऐतिहासिक नात्याचा अत्यंत मोठा अभिमान आहे. परंतु, सध्या या स्मारकाची झालेली दुरवस्था आणि संरक्षक भिंतीची पडझड पाहून मन अत्यंत व्यथित होते. राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने सचिन सूर्यवंशी-बेडके आणि महेंद्र सूर्यवंशी-बेडके यांनी यापूर्वी निवेदनाद्वारे वारंवार पालिका प्रशासनाचे या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते, मात्र तरीही प्रशासनाकडून याकडे सतत कानाडोळा केला जात होता. त्यामुळे प्रशासनाने तातडीने स्मारकाची दुरुस्ती करावी आणि संरक्षक भिंतीचे सुशोभीकरण करावे, अशी आपली आग्रही मागणी आहे. यापूर्वीच संयुक्त पुतळा समितीच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकीहाळ यांनीही नगरपालिका प्रशासनाला पत्र देऊन स्मारकाचे नूतनीकरण करण्याविषयी योग्य तो पाठपुरावा केला होता. आता खुद्द नगराध्यक्षांनी सभागृहात दिलेल्या अधिकृत आश्वासनामुळे या स्मारकाच्या दुरवस्थेचा प्रश्न कायमचा मार्गी लागेल, असा विश्वास नगरसेवक पंकज पवार यांनी व्यक्त केला असून, हे आश्वासन प्रत्यक्षात पूर्ण होईपर्यंत आपला हा पाठपुरावा अविरतपणे सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Spread the love