महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून दागिना लांबवला; फलटण पोलिसांकडून आरोपी गजाआड

। लोकजागर वृत्त । फलटण । १४ ऑगस्ट २०२६ ।

फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विढणी (ता. फलटण) गावच्या हद्दीतील २४ फाटा येथे शेतातून काम करून घरी जाणाऱ्या महिलेच्या डोळ्यात चटणी टाकून गळ्यातील सोन्याचा दागिना जबरीने लुटणाऱ्या भामट्याला फलटण ग्रामीण पोलिसांनी २४ तासांच्या आत जेरबंद केले आहे.

ही घटना दिनांक १३ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी १८:३० वाजण्याच्या सुमारास घडली होती. पीडित महिला शेतातून घरी जात असताना निर्मनुष्य जागा पाहून आरोपीने उसाच्या शेतातून पाठीमागून येत महिलेच्या डोळ्यात चटणी टाकली आणि गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून पोबारा केला. या प्रकरणी महिलेने फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने २ तपास पथके तयार केली. गुप्त माहितीदाराकडून संशयित आरोपी विढणी गावातीलच असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले. सुरुवातीला पोलिसांना दिशाभूल करणारी उत्तरे देणाऱ्या संशयिताला खाकीचा दणका मिळताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

अथर्व उर्फ चिन्मय छगन सुतार (वय २० वर्षे, रा. विढणी, ता. फलटण, जि. सातारा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे. आरोपीकडे अधिक चौकशी केली असता, त्याला केरळ येथे फिरायला जायचे होते आणि त्यासाठीच त्याने पैशांच्या हव्यासापोटी ही चोरी केल्याचे उघड झाले. त्याच्याकडून इतरही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांच्या सूचनांनुसार फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रशांत सुबनावळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दीपक पवार, पोलीस हवालदार नितीन चतुरे, अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, पोलीस कॉन्स्टेबल हनुमंत दडस, तुषार नलवडे आणि अविनाश शिंदे यांनी केली.

Spread the love