जिल्हा बँक व राष्ट्रीयकृत बँकांच्या माध्यमातून शेतकरी खात्यांवर रक्कम वर्ग; जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची माहिती.
। लोकजागर वृत्त । फलटण । ७ ऑगस्ट २०२६ ।
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात सातारा जिल्ह्यातील तब्बल १९ हजार ५८ कर्ज खात्यांना लाभ मिळाला असून, एकूण १४२ कोटी ७ लाख ३९ हजार २८४ रुपयांची रक्कम थेट संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली आहे.
या कर्जमुक्ती योजनेत सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सर्वाधिक योगदान दिले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या १६ हजार ९९५ कर्ज खात्यांवर एकूण १२२ कोटी ९ लाख ५९ हजार ८४८ रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला आहे. यामुळे बँकेच्या सभासद शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून कृषी क्षेत्राला पुन्हा एकदा नवसंजीवनी मिळण्यास मदत होणार आहे. सहकारी बँकांसोबतच जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत आणि व्यापारी बँकांच्या माध्यमातूनही शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. राष्ट्रीयकृत व व्यापारी बँकांमधील २ हजार ६३ कर्ज खात्यांवर १९ कोटी ९७ लाख ७९ हजार ४३६ रुपये जमा करण्यात आले आहेत.
प्रसिद्ध झालेल्या यादीतील सुमारे ६ हजार शेतकऱ्यांनी अद्यापही त्यांची ई-केवायसी पूर्ण करून आधार प्रमाणीकरण केलेले नाही. अशा सर्व शेतकऱ्यांनी त्यांचा शेतकरी ओळख क्रमांक (ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी) तात्काळ काढून घ्यावा व आपले आधार प्रमाणीकरण पूर्ण करून घ्यावे, म्हणजे सदर कर्जमुक्ती योजनेचा लाभ त्यांना तातडीने मिळणे सुलभ होईल. मयत शेतकऱ्यांच्या वारसांनी त्यांची वारस नोंद त्यांच्या महसुली दप्तरावर (७/१२ वर) करून घेण्यासाठी महसूल विभागाकडे वारसाच्या नावांसह अर्ज करावा, जेणेकरून त्यांची वारस नोंद होऊन त्यांना शेतकरी ओळख क्रमांक (ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी) काढणे व आधार प्रमाणीकरण पूर्ण करून योजनेचा लाभ घेणे शक्य होईल. याबाबत सर्व तहसीलदार यांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी सदर योजनेबाबत कोणतीही अडचण असल्यास, जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समिती तसेच जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सातारा व तालुका स्तरावरील तहसीलदार आणि तालुका सहाय्यक निबंधक यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.
